राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच आता संगमनेरातून अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेत शाळा- महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींच्या मार्गात थांबून शाहरुख गुलामनबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत नग्न होऊन विकृत चाळे करीत असल्याचे समोर आले आहे. सुकेवाडी रस्त्यावर गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रकाराबाबत ग्रामस्थांना समजल्यानंतर त्यांनी आज सकाळी त्या विकृताला नग्नावस्थेतच पकडून धू धू धुतला. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र, शहर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत त्या विकृताला ताब्यात घेतल्यानंतर तणाव निवळला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी पावणेसातच्या सुमारास सदरचा प्रकार घडला. मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला आणि सुकेवाडी परिसरात स्थिरावलेला शाहरुख गुलामनबी अन्सारी हा परप्रांतीय विकृत गेल्या दीड महिन्यांपासून सुकेवाडी रस्त्यावर पहाटे लहान मुली व शाळा-महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनींकडे पाहून अश्लील चाळे करीत असल्याचे समोर आले आहे. त्याच्या या विकृत प्रकाराने विद्यार्थिनी हैराण झाल्या होत्या; मात्र सांगायचं कसं, हा प्रश्न असल्याने दीड महिन्यांपासून हा प्रकार सहन केला जात होता. मात्र, याबाबत माहिती समजताच आज सकाळी सुकेवाडीतील ग्रामस्थांनी त्याला आक्षेपार्ह अवस्थेत रस्त्यातच गाठून बेदम चोपून काढले. त्यामुळे या परिसरात काहीकाळ मोठा तणावही निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी शाहरुख गुलामनबी अन्सारी (मूळ रा. उत्तर प्रदेश. सध्या रा. सुकेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी गजाआड केले आहे. सुकेवाडीच्या ग्रामस्थांनी वेळीच या प्रकाराकडे लक्ष दिल्याने या विकृताकडून कोणताही अनर्थ घडण्यापूर्वीच त्याच्या मुसक्या आवळल्या गेल्या. या घटनेने संताप व्यक्त होत असून, त्या विकृताला कठोर शिक्षेची मागणी केली जात आहे.