नागपूर रेल्वे स्टेशनवर मनोरुग्णाच्या हल्ल्यात 2 ठार

एका मनोरुग्णाने नागपूर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या 12 प्रवाशांवर अचानक हल्ला केला. यात दोघे ठार झाले, तर पाच जखमी झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांची एकच धावपळ उडाली. आरोपीला लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गणेश कुमार असे मृत प्रवाशांपैकी एकाचे नाव असून दुसऱया मृत प्रवाशाची ओळख पटलेली नाही.

कोण आहे हल्लेखोर मनोरुग्ण?

हल्लेखोर मनोरुग्ण हा मूळचा उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिह्यातील हैदरपूरचा रहिवासी असून त्याचे नाव जयराम केवट आहे. आरोपीने रेल्वे स्टेशनवर अनेकांसोबत वाद घातला. त्यानंतर तो अचानक हिंसक झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. आरोपी नागपूर रेल्वे स्थानकावर कसा पोहोचला? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.

– दिवसाढवळय़ा पोलिसांचा बंदोबस्त असतानाही अशाप्रकारच्या हल्ल्याच्या घटना घडत असल्याने आणि निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचे समोर आले आहे.