जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना निकृष्ठ दर्जाचे गणवेश, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला भ्रष्टाचाराचा आरोप

नगर जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना अर्धे शैक्षणिक वर्ष संपत आल्यावर गणवेश मिळण्यास सुरुवात झाली आहे. परंतु,काहींना ढगळ तर काहींना लहान गणवेश मिळाले. काहींना फाटके तर काहींना तिरप्या खिशांचे गणवेश मिळालेत त्यातही कापडाचा आणि शिलाईचा दर्जा निकृष्ट असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थिनींना देखील कमी साईजचे गणवेश मिळाल्याने अनेक पालकांनी सदर गणवेश सपशेल नाकारला आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशात देखील भ्रष्टाचार करण्याचे पाप या खोके सरकारने केले आहे. त्यामुळे त्यांना लाजा वाटू द्या अशी संतप्त प्रतिक्रिया माजी मंत्री, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली आहे.

तनपुरे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळेत गरीबांची मुले शिकतात. अर्धे वर्ष संपले तरी गणवेशा पासुन वंचित ठेवण्याचे पाप खोके सरकारने केले आहे. जुन मध्ये शाळा चालू झाल्यावर गोरगरिब विद्यार्थ्यांना दोन गणवेश देणे अपेक्षित होते. सप्टेंबर महिण्यात अर्धे शैक्षणिक वर्ष संपेल. अजुनही अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नाही. जे गणवेश मिळाले आहेत त्याची परीस्थिती वाईट आहे. विद्यार्थ्यांच्या गणवेशात भ्रष्टाचार करणारे हे सरकार आहे. शैक्षणिक धोरणात “एक राज्य एक गणवेश” धोरण सरकारने आपले खिसे भरविण्यासाठी ठरविले आहे. सातवीच्या अनेक मुलींना अपुर्‍या मापाचे गुडघ्याच्या वर गणवेश मिळाले आहेत. काही मुलींचे गणवेश फाटलेले आढळले आहेत. असे गणवेश कसे घालावेत? असा प्रश्न मुलींसमोर पडला आहे. त्यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.असे तनपुरे यांनी सांगितले.

कापड खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तनपुरे यांनी केला आहे. ”विद्यार्थ्यांनी कपडे अंगात घातल्यावर कापड फाटते.शिलाई व्यवस्थित नाही. या सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. कुठल्या गोष्टीत खायचे याची लाज राहिली नाही. शालेय विद्यार्थ्यांच्या गोरगरीबांच्या मुलांच्या गणवेशात पैसे खाण्याचे पाप केले आहे. या सरकारची आता जायची वेळ आली आहे. जाता जाता सगळीकडे हात मारायचे काम करीत आहे, असा आरोप तनपुरे यांनी केला आहे.

तनपुरे यांनी सरकारवर टिका करताना सांगितले की, विद्यार्थ्यांच्या गणवेशा बाबत अक्षम्य चुक केली ही निंदनीय बाब आहे. मोठ्या प्रमाणात कापड खरेदी केले. त्या कापडाच्या दर्जाची चौकशी झाली पाहिजे. गणवेश अंगात घातल्यावर कापड फाटत असेल तर कापड खरेदीत किती मोठा भ्रष्टाचार असेल,बचत गटांना शिलाई करण्यासाठी दिले पाहिजे होते. दुसरीकडून शिवले असल्याने शिलाई नीट झालेली नाही, याची जबाबदारी कोण घेणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यावर हात झटकणारे हे सरकार आहे. या सरकारला कोणत्याही प्रकारची लाज वाटत नाही. विद्यार्थ्यांच्या गणवेशा बाबत भ्रष्टाचार करणारे सरकार शिक्षणा बाबतीत किती गंभीर आहे यावरुन दिसून येते. हे सरकार दोन महिन्यानंतर सत्तेतुन गेल्या शिवाय राहणार नाही.