नगर अर्बन बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी अर्बन बँक बचाव समितीच्या वतीने आज, दि. ३ रोजी बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांच्या स्टेशन रोड येथील दुकानासमोर ठेवीदारांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईस विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करतानाच संचालक व अधिकाऱ्यांनी बँकेत आतापर्यंत केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावेही ठेवीदारांच्या वतीने पोलिसांना प्रातिनिधीक स्वरूपात सादर केले.
शतकोत्तर वैभवशाली परंपरा व राज्यात लौकिकप्राप्त असलेली नगर अर्बन बँक अवसायनात निघाली. चेअरमन, संचालक व बँक अधिकारी यांनी संगमताने प्रचंड भ्रष्टाचार करून ही बँक रसातळाला नेल्याचा आरोप बँक बचाव समितीच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. मध्यंतरी ठेवीदारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेऊन गैरव्यवहार प्रकरणी संचालक- अधिका-यांवर ठेवीदार संरक्षण कायद्याचे कलम वाढविण्यात आले आहे. परंतु भ्रष्टाचा-यांना अटक व वसुली याबाबत कार्यवाही होत नसल्याने पोलिसांवर ठेवीदार नाराजी व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बँकेत अडकलेल्या ठेवी परत मिळाव्यात तसेच दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी आज बँकेचे संचालक शैलेश मुनोत यांच्या स्टेशन रोड येथील दुकानासमोर ठेवीदारांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बँकेच्या संचालक व अधिका-यांनी सन २००९ पासूनच्या भ्रष्टाचाराचे प्रातिनिधीक स्वरूपातील पुरावे पोलिसांना सादर करण्यात आले. कोण म्हणते देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करून ठेवीदारांनी परिसर दणाणून सोडला. आंदोलनात बँक बचाव समितीचे राजेंद्र गांधी यांच्यासह ठेवीदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठेवीदारांनी मांडली कैफियत
बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केला व ठेवीदारांचा विश्वासघात केला. त्यामुळे अर्बन बँक बंद पडली. दि. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी संचालक- अधिका-यांवर महाराष्ट्र ठेवीदार हित संरक्षण कायद्याचे वाढीव कलम लावण्याची कार्यवाही झालेली आहे. कोतवाली, तोफखाना, शेवगाव या पोलीस ठाण्यात बँकेच्या पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. तसेच श्रीगोंदा व राहाता पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याचे तक्रार अर्ज दाखल आहेत. परंतु एवढ्या सर्व गोष्टी होऊनही कारवाईस मोठा विलंब होत असून, दोषींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्याचा प्रयत्न झालेला नाही. यामुळे ठेवीदारांच्या हक्काचे व कष्टाचे पैसे परत मिळण्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठेवीदार वयोवृद्ध, निराधार महिला, विधवा व दुर्धर आजाराने ग्रस्त आहेत. ठेवी अडकल्याने त्यांना जगणे मुश्कील झाले आहे, याकडे ठेवीदारांनी लक्ष वेधले. अनेक ठेवीदारांनी ठेवी अडकल्याने सोसाव्या लागत असलेल्या यातनांची कैफियत यावेळी माध्यमांसमोर मांडली.
पुरावे सादर करण्याचे अभिनव आंदोलन, आता तरी पोलीस कारवाई करणार का ?
अर्बन बँकेत नियोजनपूर्वक भ्रष्टाचार सुरू असल्याबाबत बँक बचाव समितीने वेळोवेळी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. फेब्रुवारी २०१९ पासून यासंदर्भात पाठपुरावा करूनही दुर्दैवाने पोलिसांनी दखल घेतली नाही. नाईलाजास्तव आम्हाला खंडपीठात दाद मागावी लागली व न्यायालयाने नोटीस काढल्यानंतर नगर अर्बन बँकेतील भ्रष्टाचाराविरूद्ध दि १७ फेब्रुवारी २०२२ रोजी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला. परंतु या सर्व प्रक्रियेत तब्बल ३ वर्षाचा विलंब झाला व या विलंबाचा गैरफायदा घेत संबंधित आरोपींनी बँकेत आणखी जास्त भ्रष्टाचार केला. ही वैभवशाली बँक भ्रष्टाचारामुळे दि ४ ऑक्टोबर २०२३ रोजी अखेर बंद पडली. वाढीव कलम लावूनही पोलिसांकडून ठोस कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे ठेवीदार नाराज आहेत. आता आम्ही बँकेतील भ्रष्टाचाराचे पुरावेच पोलिसांना सादर केले आहेत. ठेवीदारांनी भ्रष्टाचाराचे पुरावे देण्याचे हे राज्यातील पहिलेच अभिनव आंदोलन आहे. आता तरी पोलीस दोषींवर ठोस कारवाई करून ठेवीदारांना दिलासा देतील, अशी अपेक्षा आहे.