नगर-पुणे महामार्गावर निवडणूक पथकाची कारवाई आयकरकडून रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील सुपे टोलनाक्यावर तैनात असलेल्या स्थिर पथकाने केलेल्या तपासणीत वाहतूक कंपनीच्या गाडीतून कोटय़वधी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच या गाडीतून 40 किलो वजनाची चांदीची वीट आढळली आहे. याबाबत निवडणूक आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी ही बाब आयकर विभागाला तसेच सुपे पोलिसांना कळवली. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गायत्री सौंदाणे यांनी दुजोरा दिला आहे. सायंकाळी उशिरापर्यंत 10 कोटी रुपयांच्या सोन्याची मोजदाद करण्यात आल्याची माहिती समजली आहे.

गाडीमध्ये सोने, चांदीच्या वस्तू आढळून आल्याची माहिती मिळताच आयकर विभागाचे अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी, आचारसंहिता कक्षप्रमुख सुपे टोलनाक्यावर दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आयकर विभागाच्या अधिकाऱयांकडून सोने व चांदीच्या विविध वस्तूंची मोजदाद सुरू होती. संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुमारे 10 कोटींच्या सोन्याची मोजदाद झाली होती. सोन्याच्या अद्याप बऱयाच वस्तू मोजणे बाकी असल्याचे आचारसंहिता कक्षप्रमुख दयानंद पवार यांनी सांगितले.

आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुण्यावरून अहिल्यानगरकडे जाणारे बीव्हीसी लॉजिस्टिक्स कंपनीचे काळ्या रंगाचे बंदिस्त पीकअप वाहन (एमएच 09 ईएम 9530) तपासणी पथकाने तपासणीसाठी थांबवले. तपासणीत या वाहनात मोठय़ा प्रमाणावर सोने तसेच चांदीची 40 किलोची वीट आढळून आली.

वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱयांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. तसेच त्यांच्याकडे असलेल्या वाहतुकीच्या पावत्या व प्रत्यक्षात असलेले सोने यांचा हिशेब जुळत नव्हता. सोन्याची वाहतूक नेमकी कुठून कुठे केली जात आहे, याबाबत वेगवेगळी माहिती वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱयांकडून दिली जात होती. वाहनात सापडलेल्या सोन्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने तपासणी पथकप्रमुख माधव गाजरे यांनी या प्रकाराची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख दयानंद पवार यांना कळवली. त्यानंतर आयकर विभाग तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत तब्बल 10 कोटी रुपये किमतीच्या सोन्याची मोजदाद झाली असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत तपासणी सुरूच होती.

करचुकवेगिरीचा संशय

z विधानसभा निवडणुकीचा आणि या सोन्याचा संबंध नसावा. मात्र, मोठय़ा प्रमाणावर करचुकवेगिरी करण्यासाठी अवैध पद्धतीने कोटय़वधी रुपये किमतीच्या सोन्याची वाहतूक करण्याचा हा प्रकार असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.