नगर-पुणे इंटरसिटी सुरू करण्याबाबत कार्यवाही करा, खासदार नीलेश लंके यांचे निर्देश

नगर-पुणे इंटरसिटी लाईन केवळ मेंटेनन्स पॉइंट नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ही लाईन सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार नीलेश लंके यांनी दिले.

रेल्वेसंदर्भातील विविध अडचणींसंदर्भात खासदार नीलेश लंके यांनी नगर येथील रेल्वे व्यवस्थापक यांच्या दालनामध्ये रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. या बैठकीत बीड-परळी रेल्वेमार्ग इंगणवाडीपर्यंत पूर्ण झाला असून, सुमारे 50 ते 60 किलोमीटरचे काम प्रलंबित आहे. या कामाचा आढावा घेण्यात येऊन हे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात लंके यांनी सूचना दिल्या.

बैठकीत नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, राहुरी तसेच इतर काही भागांमध्ये शेतकऱ्यांना तसेच त्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसंदर्भात रेल्वेशी निगडित अडचणींवरही यावेळी चर्चा झाली. ओव्हर ब्रिज, रेल्वे क्रॉसिंग, अंडरग्राउंड ब्रिज आदी अडचणींचा आढावा घेण्यात येऊन त्या दूर करण्यासाठी खासदार लंके यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय अभियंता देवेंद्रकुमार, दौंड-मनमाड रेल्वे लाईनचे उपअभियंता दीपक कुमार, सहायक अभियंता एस. सुरेश, सहायक अभियंता त्रिवेदी, वरिष्ठ शाखा अभियंता अजय चोभे, स्टेशन मास्तर एन. पी. तोमर, मुख्य वाणिज्य निरीक्षक पी. जी. वारे, ट्रफिक इन्स्पेक्टर तथा रेल्वे सुरक्षा इन्स्पेक्टर सतपाल सिंग, बेलापूरचे वरिष्ठ शाखा अभियंता विनयकुमार यांनी सहभाग नोंदविला. घनःश्याम शेलार, नगरसेवक योगीराज गाडे, नगरसेवक प्रदीप परदेशी, दत्ता जाधव, सरपंच पोपटराव पुंड, अजय लामखडे,
शिवाजी होळकर, सचिन पठारे, बाबा काळे, दत्ता खताळ, रामेश्वर निमसे आदी उपस्थित होते.

कोरोना काळातील पॅसेंजर सुरू ठेवा

सध्या ‘अमृत भारत योजने’अंतर्गत अनेक ठिकाणी रेल्वेची विकासकामे सुरू आहेत. या कामांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. कोरोनाकाळामध्ये सुरू करण्यात आलेल्या पॅसेंजर ट्रेन्स या कालावधीनंतरही प्रवाशांसाठी सोईच्या होत्या. त्या सुरू करण्याबाबत प्रवाशांची मागणीही होती. या मागणीचा विचार करून या पॅसेंजर सुरू ठेवण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना खासदार नीलेश लंके यांनी यावेळी दिल्या.

नगर स्थानकावर थांबा द्या

नगर स्थानकावर पुणे-लखनौ, पुणे-गोरखपूर व पुणे-अंजनी या रेल्वेगाडय़ांना थांबा नाही. या गाडय़ांना थांबा मिळावा, यासाठी पुणे येथील विभागीय व्यवस्थापक यांच्यामार्फत प्रस्ताव तयार करून कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना लंके यांनी केली.