Nagar News : जलविभागाने जखमेवर मीठ चोळले; गोदावरी नदीत पाणी सोडल्याने कोपरगावमध्ये पाणीबाणी

पावसाने पाट फिरवली, जून महिना कोरडा गेला, धरणातले पाणी आटले आणि तलावांनी सुद्धा तळ गाठल्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांना 12 दिवसांनी एकदा पिण्याचे पाणी मिळत आहे. पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे, तर पाण्याअभावी पिकांनी माना टाकल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न शहारमध्ये उद्भवला आहे. असे असताना नाशिक जलविभागाने नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्यातून कालव्यांमध्ये पाणी सोडण्याऐवजी गोदावरी नदीत पाणी सोडून कोपरगाव वासियांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले आहे.

पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या कोपरगावात निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून शेतकरी सुद्धा हवालदिल झाला आहे. अशातच नाशिक जलविभागाने केलेल्या कृत्यामुळे कोपरगाव वासियांचा पारा चांगलाच चढला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये अपेक्षीत पाऊस न पडल्यामुळे पाण्याची आवक म्हणावी तशी झालेली नाही. परंतू नाशिक शहर व निफाड तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे नांदुर-मधमेश्वर बंधारा भरला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातून 200 क्युसेकने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. पण जर हेच पाणी उजव्या व डाव्या कालव्यांमध्ये सोडले असते, तर शेतीसह कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुद्धा निकाली निघाला असता. पण असे न करता पाटबंधारे खात्याने चुकीच्या पद्धतीने ऐन दुष्काळात गोदावरी नदी पात्रात पाणी सोडून उजव्या व डाव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि नागरिकांवर अन्याय केला आहे. जल विभागाच्या या कृत्याचा पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर यांनी जाहीर निषेध केला.