Nagar News – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना! बँकेतून पैसे न मिळाल्याने महिला संतप्त, तहसीलदारांकडे मागीतली दाद

नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामधील फिनकेअर फायनान्स या बँकेमध्ये तालुक्यातील काही महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे आले आहेत. मात्र पैसे काढायला या महिला गेल्या असता तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, अशा प्रकारचे उत्तर बँकेच्या वतीने देण्यात आले. त्यामुळे महिला चांगल्याच संतप्त झाल्या आणि त्यांनी थेट तहसीलदर कार्यालय गाठले.

संतप्त झालेल्या महिलांनी, आमच्या हक्काचे पैसे आहेत आम्हाला तुम्ही का देत नाही? असा थेट सवाल बँकेला केला. तुमच्या नावावर आगोदरच कर्ज आहे त्यामुळे तुम्हाला हे पैसे देता येणार नाहीत, असे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांना सांगितले. त्यामुळे महिला जास्त संतप्त झाल्या आणि त्यांनी तत्काळ तहसीलदार प्रमोद सागरे यांची भेट घेतली आणि त्यांना एक लेखी निवेदन दिले. बँकेने अडवणूक केल्यामुळे सरकारी योजनेचे पैसे आम्हाला वेळेवर मिळत नाहीत, असे लेखी निवेदनाद्वारे महिलांनी तहसीलदरांना सांगितले आहे. वास्तविक पाहता राज्य सरकारने या योजनेचे पैसे तत्काळ देण्याचे आदेश दिले आहेत. असे असताना अशा प्रकारे जर महिलांना आपल्या खात्यामध्ये पैसे येऊन सुद्धा मिळणार नसतील तर, या योजनेचा काय उपयोग? असा प्रश्न संतप्त महिलांनी राज्य सरकारला विचारला आहे.