Nagar News : दुष्काळात तेरावा! कोपरगावात व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया

कोपरगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य रस्त्यावरील पालिकेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह शुक्रवारी दुपारी अचानक फुटला. परंतु ढीम्म प्रशासनाने दिवसभरात या व्हॉल्व्हची दुरुस्ती केली नाही. त्यामुळे काल (12 जुलै) दुपारी दोन वाजल्यापासून ते आज सकाळी नऊ वाजेपर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले.

कोपरगाव शहराला सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. म्हणावा तसा पाऊस अद्याप न पडल्यामुळे तलावांमध्ये आणि धरणांमध्ये पाण्याची कमतरता आहे. पाण्याची भीषण परिस्थिती असताना व्हॉल्व फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. व्हॉल्व फुटल्यानंतर पाणी बंद करणे गरजेचे होते. मात्र व्हॉल्व बंद करण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. या घटनेला जबाबदार कोण त्यांच्यावर मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने निर्णय घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.