Nagar News – एकरुखे गावात गॅस सिलिंडरचा स्फोट, नऊजणांसह पाच जनावरे होरपळली

नगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील एकरुखे गावात घरगुती गॅस सिलिंडर लीक होऊन मोठा स्फोट झाला. या स्फोटात नऊ जणांसह जनावरे होरपळली. जखमींना तत्काळ प्रवरा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.

राहाता तालुक्यातील एकरुखे येथील वायकर वस्ती आहे. शेजारी शेजारी दोन कुटुंब राहतात शेती बरोबर दूध उत्पादन करत असल्यामुळे त्यांच्याकडे दुधाळ जनावरे देखील आहेत. शुक्रवारी (23 ऑगस्ट) सकाळी 7 च्या भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस टाकी संपली असता नवीन गॅस टाकी बसवत असताना टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस टाकी घराबाहेर आणली असता बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील जाळाचा आणि गॅसचा संपर्क आल्याने मोठा स्फोट झाला. हा स्पोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा मोठा भडका उडाला आणि महिला, पुरुष आणि लहान मुलांसह नऊ जण तसेच गोठ्यातील चार ते पाच जनावरे होरपळी आहेत. या घटनेत सुरेश भाऊसाहेब वायकर, विमल सुरेश वायकर, अनुजा सुरेश वायकर, भाऊसाहेब गंगाधर वायकर, सृष्टी सुरेश वायकर, यश किरण विप्रदास यांच्यासह आणखी दोघे जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून जनावरांवरही उपचार सुरू आहेत. गॅस गळतीमुळे झालेल्या स्फोटाने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.