नगर महापालिका आयुक्त फरार, कार्यालय सील; एसीबीने केली धडक कारवाई

भ्रष्टाचाराने शासकीय यंत्रणा पोखरली गेली असून, बांधकाम व्यवसायिकाकडे आठ लाख रूपयांची लाच मागणाऱया नगर महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर आज एसीबीने धडक कारवाई केली आहे. आयुक्तांचे कार्यालय आणि शासकीय निवासस्थान सील करण्यात आले आहे. या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त जावळे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक लिपिक श्रीधर देशपांडे यांनी रजा टाकली आणि ते फरार झाले आहेत. त्यांच्या शोधासाठी एसीबीचे तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत.

गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून अँटी करप्शन ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱयांनी कारवाईला सुरूवात केली. एसीबीचे पथक महापालिकेत धडकले आणि आयुक्त पंकज जावळे यांच्या कार्यालयाची झाडाझडती घेतली. कागदपत्रे जप्त केली आणि सील ठोकले. त्यानंतर जावळे यांच्या शासकीय निवासस्थानी हे पथक गेले आणि तेही सील करण्यात आले आहे. तसेच महापालिका आयुक्तांचे स्वीय सहाय्यक श्रीधर देशपांडे (वय 48) यांच्या घराची पोलीस निरीक्षक छाया देवरे यांच्या पथकाने झडती घेतली. देशपांडे यांच्या घरात 93 हजार रूपये रोख, साडेआठ तोळ्याचे दागिने, नगर शहर उपनगरात खरेदी केलेली नऊ मालमत्तांची कागदपत्रे, बीड जिल्हय़ातील शेतजमीनीची कागदपत्रे आढळून आली. तसेच एक चारचाकी वाहनाची कागदपत्रे जप्त केली. या कारवाईची माहिती कळताच महापालिका प्रशासनात खळबळ उडाली. कर्मचारी आणि अधिकारी कारवाईबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू होती.

नागरिकांकडून स्वागत; फटाके फोडले
नगर महापालिकेत प्रशासनाचा कारभार आहे. महापालिका आयुक्त डॉ. जावळे हे प्रशासक आहेत. नगररचना विभागामध्ये सावळा गोंधळ सुरू आहे. बांधकाम परवानगीच्या अनेक फायली पडून आहेत. फायली अडवा आणि जिरवा असा हा कारभार आहे. या कारभाराविरूद्ध नागरिकांमध्ये संताप आहे. आज एसीबीकडून झालेल्या कारवाईची नागरिकांनी स्वागत केले. काही जणांनी थेट महापालिकेसमोर फटाके फोडले.

आठ लाखांची केली मागणी
याबाबत बांधकाम व्यावसायिकाने छत्रपती संभाजीनगर येथील एसीबी कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराचा भागीदारीत पह्र के रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय आहे. त्यांनी नगर महापालिका हद्दीतील मौजे नगर येथील नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला आहे. या प्लॉटवर त्यांना बांधकाम करायचे आहे. त्यासाठी नगर महापालिकेकडे बांधकाम परवानगीसाठी 18 मार्च 2024 ला ऑनलाईन अर्ज केला होता. मात्र, महापालिका प्रशासनाकडून बांधकाम परवानगी देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. बांधकाम परवानगीसाठी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी लिपिक श्रीधर देशपांडेमार्फत सुरूवातीला 9 लाख 30 हजार रूपयांची लाच मागितली. तक्रारदार बांधकाम व्यवसायिकाने लाच देण्यास नकार दिला आणि अँटी करप्शन ब्युरोच्या जालना कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. श्रीधर देशपांडे यांनी आयुक्त पंकज जावळे यांच्यामार्फत बांधकाम व्यवसायिकाकडे आठ लाख रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. यावेळी महापालिका आयुक्त जावळे हे देशपांडे यांना बांधकाम व्यवसायिकाकडे लाच मागण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर एसीबीने आयुक्त जावळे आणि देशपांडेविरूद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधिक्षक मुपुंद आघाव, उपअधिक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर, पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमघडे, गणेश चेके, गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात, विठ्ठल कापसे, भालचंद्र बिनोरकर यांच्या पथकाने केली.

कारवाईची कुणकुण लागताच जावळे, देशपांडे रजेवर गेले
आयुक्त डॉ. पंकज जावळे आणि लिपिक देशपांडे हे दोघेही सुट्टीवर गेल्यामुळे ते ताब्यात आले नाहीत, अशी माहिती एसीबीचे पोलीस उपअधिक्षक किरण बिडवे यांनी दिली. दरम्यान, या दोघांना कारवाईची कुणकुण लागली होती. त्यामुळे हे दोघे रजा टाकून फरार झाले असून त्यांच्याशोधासाठी एसीबीची तीन पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली आहे, अशीही चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.