नगरमध्ये मिरवणुकीलक ड्रोन कॅमेरा, सीसीटीव्हीची नजर, साडेतीन हजार पोलिसांचा बंदोबस्त

drone

शहरासह जिह्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिह्यात सुमारे तीन हजार लहान-मोठय़ा सार्वजनिक व खासगी गणेश मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केली असून, उद्या (मंगळवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. दरम्यान, पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेऱयांसह सुमारे साडेतीन हजार पोलीस व होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळी 10 वाजता मिरवणुकीस प्रारंभ

नगर शहरात पहिला मानाचा गणपती ग्रामदैवत विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या हस्ते गणेशाची पूजा होऊन सकाळी 10 वाजता मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. माळीवाडा विशाल गणपतीनंतर मानाची गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. मिरवणूक मार्ग व परिसरातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱयांची नजर राहणार आहे. केडगाव उपनगर, सावेडी उपनगर परिसरातही अनेक मंडळे स्वतंत्र मिरवणुका काढणार आहेत.

ग्रामीण भागातही जल्लोष

नगर जिह्यात यंदा गणेशोत्सव मोठय़ा धुमधडाक्यात साजरा केला जात आहे. जिह्यात 2636 लहान-मोठय़ा सार्वजनिक व 113 खासगी गणेश मंडळांसह 261 गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेतून श्री गणेशाची स्थापना केली आहे. नगर शहरासह जिह्यातील संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, कोपरगाव या प्रमुख शहरांसह ग्रामीण भागातील छोटय़ा-मोठय़ा मंडळांतील श्रीगणेशाचे उद्या विसर्जन केले जाणार आहे. संबंधित पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ध्वनिपातळी तपासणीसाठी स्वतंत्र पथक

n पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली 2 अपर पोलीस अधीक्षक, 7 पोलीस उपअधीक्षक, 37 पोलीस निरीक्षक, 63 सहायक व उपनिरीक्षक, 1535 पोलीस कर्मचारी, 947 होमगार्ड, ‘आरसीपी’च्या तीन तुकडय़ा, ‘क्यूआरटी’च्या दोन तुकडय़ा, ‘एसआरपीएफ’ची एक कंपनी, ‘आरएएफ’ची एक कंपनी, स्ट्रायकिंग फोर्स 10, साध्या वेशातील पोलीस पथके, छेडछाड विरोधी पथक, ध्वनिप्रदूषण पातळी मोजण्यासाठी स्वतंत्र पथक असणार आहे. शहरात मिरवणूक मार्गावर कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून नगर शहर पोलीस अधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.