नगर जिल्हा रुग्णालयातून पूजा खेडकरांना नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र! तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकाऱयाची होणार चौकशी

परवानगी नसताना खासगी ऑडी कारवर लाल दिवा लावल्याने, तसेच वरिष्ठ अधिकाऱयाच्या अॅण्टी चेंबरमध्ये स्वतःचे कार्यालय थाटल्याने राज्यभरात चर्चेत असलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती आहे. याप्रकरणी आता तत्कालीन जिल्हा चिकित्सकांची चौकशी होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांनी नगरच्या जिल्हा रुग्णालयातून प्रमाणपत्रे घेतली असल्याची माहिती अभिलेख तपासणीमध्ये समोर आली आहे. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातून 2018 मध्ये नेत्रदिव्यांग प्रमाणपत्र आणि 2020 मध्ये मानसिक आजारी असल्याचे प्रमाणपत्र त्यांना देण्यात आल्याचे समजते.

पूजा खेडकर यांना नेत्रदिव्यांग आणि मानसिक आजारी असल्याचे एकत्रित प्रमाणपत्र 2021 मध्ये देण्यात आले आहे. शासकीय रुग्णालयाचे दस्तावेज तपासले असता त्यात या नोंदी आढळल्या असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांनी सांगितले. पाथर्डी तालुक्यातील  खेडकर यांनी तेथून नॉन क्रिमीलेयरचेही प्रमाणपत्र मिळविल्याची चर्चा आहे.

पूजा खेडकर यांचे वडील सेवानिवृत्त सनदी अधिकारी दिलीप खेडकर हे भालगाव येथील रहिवासी आहेत. त्यांची मुलगी पूजा खेडकर या दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांची पुण्यात नियुक्ती झाली होती. खासगी वाहनावर लाल दिवा व ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्ड लावणे, वरिष्ठ अधिकाऱयाच्या अॅण्टी चेंबरमध्ये स्वतःचे कार्यालय थाटणे आदी नियमबाह्य वर्तन त्यांनी केले. या कारनाम्यांमुळे त्यांची वाशीमला बदली करण्यात आली आहे.