आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त केल्यावर सरकार जागं होईल? बागमती एक्स्प्रेसच्या अपघातावर राहुल गांधींचा संताप

तामिळनाडूत म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला. म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकल्याने हा अपघात झाला. चेन्नईपासून 46 किमी अंतरावर अपघाताची ही घटना घडली आहे. सततच्या रेल्वे अपघातांवरून लोकसभा विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी केंद्र सरकार हल्लाबोल केला आहे. म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसच्या अपघाताने ओडिशातील बालासोरमधील भीषण रेल्वे दुर्घटनेच्या कटु आठवणी जाग्या झाल्या, असे म्हणत राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि रेल्वेमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

एकामागून एक रेल्वे अपघाताच्या घटना होत असल्याने देशात आता रेल्वे दुर्घटना एक सामान्य घटना झाली आहे. या रेल्वे अपघातांची जबाबदारी ठरवली जात नाही आणि कारवाईही केली जात नाही, अशी टीका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे.

काय म्हणाले राहुल गांधी?

म्हैसूर-दरभंगा बागमती एक्स्प्रेसच्या अपघाताने ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघाताची आठवण झाली. त्यावेळीही एक्स्प्रेस मालगाडीला धडकली होती. सततच्या रेल्वे अपघातांमध्ये कित्येक नागरिकांचा जीव जात आहे. पण यातून सरकारने कुठलाही धडा घेतलेला नाही. अपघाताची जबादारी ही उच्चपदांपासून ठरवायला हवी. आणखी किती कुटुंब उद्ध्वस्त केल्यावर हे सरकार जागं होईल? असा सवाल करत राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे.

तामिळनाडूत कावराईपेट्टई इथे शुक्रवारी रात्री बागमती एक्स्प्रेस मालगाडीला धडकली. यानंतर बागमती एक्स्प्रेसचे 12 डबे रुळावरून घसरले. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. अपघात 9 जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती दक्षिण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली.