वीजचोरीच्या गुन्हय़ात पोलिसांना कोर्टाचा झटका, तपासातील विसंगतीमुळे आरोपीची निर्दोष सुटका

नऊ वर्षांपूर्वी माटुंग्यातील फेरीवाल्याविरोधात दाखल केलेल्या वीजचोरीच्या गुह्यात सत्र न्यायालयाने पोलिसांना झटका दिला. न्यायालयाने तपासकामातील गंभीर त्रुटींवर बोट ठेवत आरोपी मुस्ताफा हमजा शेखची निर्दोष सुटका केली. सरकारी साक्षीदार तसेच पुराव्यांतील विसंगती विचारात घेता पोलीस तपासाबाबत गंभीर शंका निर्माण होते, असे स्पष्ट निरीक्षण अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. पी. त्रिभुवन यांनी निकालपत्रात नोंदवले.

बेस्ट प्रशासनातील उपअभियंता संतोष कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शाहूनगर पोलिसांनी आरोपी मुस्ताफा शेखला 12 जून 2015 रोजी अटक केली होती. मुस्ताफाने माटुंगा पॅम्प-नित्यानंद नगर येथील मीटर केबिनमधून वीजचोरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर आरोपीतर्फे अॅड. प्रकाश साळसिंगीकर आणि अॅड. सुनीता खंडाळे यांनी आक्षेप घेतला. पोलिसांनी घटनास्थळी न जाताच खोटा एफआयआर दाखल केला. बेस्ट प्रशासनाच्या दबावातून अशा प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले जातात, असा युक्तिवाद त्यांनी केला. याची गंभीर दखल सत्र न्यायालयाने घेतली.