व्होट जिहादचा आरोप करणाऱ्या महायुतीलाच मुस्लिम मतदारांचा पाठिंबा, आकडेवारी आली समोर

प्रातिनिधिक फोटो

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा चांगलाच फटका बसला होता. तेव्हा भाजप नेत्यांनी हा व्होट जिहाद म्हटलं होतं. पण लोकसभा निवडणूक असो वा विधानसभा निवडणूक असो दोन्ही निवडणुकीला मुस्लिम समाजाने महायुतीना भरभरून मतदान केले आहे.. राज्यात 38 विधानसभा मतदारसंघात मुस्लिम समाजाची मतं लक्षणीय आहेत. या 38 पैकी 21 जागांवर महायुतीचा विजय झाला आहे.

लोकसत्ता या दैनिकात याबाबत वृत्त देण्यात आले आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजपने कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है अशा धार्मिक ध्रुवीकरण होईल अशा घोषणा केल्या होत्या. तरी राज्यातील मुस्लिम मतदारांनी महायुतीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली आहे. राज्यातील 38 जागांमध्ये मुस्लिम मतदारांची संख्या 20 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. 38 पैकी 21 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. तर 21 पैकी 14 जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. मिंधे गटाला 38 पैकी 7 तर अजित पवार गटाला 2 जागांवर विजय मिळाला आहे.

या जागांवर भाजपचा विजय

भिवंडी पश्चिम, कारंजा, पुणे कॅन्टोनमेंट, मलकापूर,वांद्रे पश्चिम,संभाजीनगर पश्चिम,सोलापूर मध्य, अकोट, अंधेरी पश्चिम, नागपूर मध्य, धुळे शहर, रावेर, वाशिम, सायन कोळीवाडा या जागांवर भाजपला यश मिळाले आहे.
तर मिंधे गटाला नांदेड दक्षिण, कुर्ला, संभाजीनगर पूर्व, चांदिवली, नांदेड उत्तर या जागांवर विजय मिळाला आहेत अजित पवार गटाला अणुशक्तीनगर आणि अमरावतीमध्ये यश मिळाले आहे.

मुस्लीम उमेदवारांचा फायदा

या 38 ठिकाणी अनेक मुस्लीम उमदेवार निवडणुकीला उभे होते. या उमेदवारांमुळे मतदारसंघात तिरंगी लढत झाली आणि त्याचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. अमरावती विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाच्या उमेदवार सुलभा खोडके यांचा 5 हजार 431 मताधिक्क्यांनी विजय झाला. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांचा पराभव झाला. याच मतदारसंघात अलीम पटेल यांना 5 हजार 496 मताधिक्क्याने पराभव झाला. पटेल यांची मतं जर काँग्रेसला मिळाली असती तर देशमुख यांचा विजय झाला असता. अनेक मतदारसंघात असे मतविभाजन झाल्याने महायुतीला त्याचा फायदा झाला.