>>दुष्यंत पाटील
रशियन संगीतकार बोरडीन याने रचलेली ही संगीत रचना. या रचनेतून स्टेप्सला वाळवंटातून जाणारा रशियन लोकांचा कबिला व रशियन सैनिक असं या दृश्य मांडत सम्राटाने पूर्वेला केलेला साम्राज्याचा विस्तार अप्रत्यक्षपणे दर्शवायचा होता.
रशियन सम्राट अॅलेक्झांडर (दुसरा) याची कारकीर्द 1855 मध्ये सुरू झाली. आपल्या कारकीर्दीत त्याने रशियन साम्राज्याचा कॉकेशस पर्वत, मध्य आशिया आणि पूर्वेकडचा इतर काही भाग या ठिकाणी विस्तार केला. त्यानं रशियाच्या लष्करामध्ये आणि न्यायसंस्थेमध्ये केलेल्या सुधारणाही प्रभावी होत्या. त्याच्या कारकीर्दीत रेल्वे आणि उद्योगधंदे वाढल्याने रशियाचा बराच विकास झाला.
1880 मध्ये या सम्राटाच्या कारकीर्दीची 25 वर्षे पूर्ण होणार होती. या रजत महोत्सवाच्या निमित्ताने एक कार्पाम आयोजित होणार होता. या कार्पामाचा एक महत्त्वाचा भाग होता ‘टब्लो व्हीवान’. ‘टब्लो व्हीवान’ म्हणजे नेमकं काय? या शब्दाचा फ्रेंच भाषेत अर्थ होतो ‘जिवंत चित्र’! यामध्ये अभिनय करणारी मंडळी (किंवा मॉडेल्स) दृश्याला अनुसरून, योग्य अशी पार्श्वभूमी आणि प्रकाशयोजना वापरून स्थिरपणे विशिष्ट पोज देत थांबतात. एका अर्थाने हे चित्रच असतं, पण यात जिवंत लोक असतात. रजत महोत्सवाच्या या कार्पामात एकूण बारा ‘टब्लो व्हीवान’ येणार होते. प्रत्येक ‘टब्लो व्हीवान’मध्ये रशियन साम्राज्याशी संबंधित एखादं दृश्य दाखवलं जाणार होतं. प्रत्येक दृश्यासाठी योग्य असं संगीत देण्याचं काम वेगवेगळे रशियन संगीतकार करणार होते. यातल्या एका ‘टब्लो व्हीवान’साठी पार्श्वसंगीत देण्याचं काम बोरडीन या संगीतकाराला करायचं होतं.
प्रत्यक्षात हा कार्पाम झालाच नाही. 1879च्या एप्रिल आणि डिसेंबर या दोन महिन्यांमध्ये आणि 5 फेब्रुवारी 1880 या दिवशी सम्राटाची हत्या करण्याचे प्रयत्न झाले, पण ते अयशस्वी ठरले. सुरक्षेचा विचार करून ठरलेला रजत महोत्सवाचा कार्पाम रद्द करण्यात आला. बोरडीनने या कार्पामासाठी एक सुरेख संगीत रचना आधीच केली होती. ही संगीत रचना पुढे प्रचंड लोकप्रिय होणार होती. असं म्हणतात की, बोरडीन आज जिवंत असता तर त्याच्या या रचनेची आजची लोकप्रियता पाहून त्याला आश्चर्याचा धक्काच बसला असता.
बोरडीनने केलेली रचना ‘सिम्फॉनिक पोएम’ किंवा ‘सिम्फॉनिक स्केच’ या प्रकारात येत होती. एखादी कविता (किंवा दृश्य) संगीताच्या माध्यमातून यात व्यक्त होते. बोरडीनच्या संगीत रचनेचं नाव होतं ‘इन दि स्टेप्स ऑफ सेंट्रल एशिया’. बोरडीनला या रचनेमधून एक विशिष्ट दृश्य दाखवायचं होतं. या दृश्यात स्टेप्सच्या मध्य आशियामधल्या रशियन लोकांचा कबिला वाळवंटातून जात असतो. त्यांना संरक्षण देण्यासाठी सोबत रशियन सैनिक असतात. या दृश्यातून सम्राटाने पूर्वेला केलेला साम्राज्याचा विस्तार अप्रत्यक्षपणे दाखवला जाणार होता.
बोरडीनने या रचनेत तीन थीम्स वापरल्या होत्या. पहिली थीम रशियन सैनिक दाखवत होती. हे संगीत एका रशियन लोकगीताशी संबंधित असणारं होतं. दुसऱया थीममध्ये कबिल्यामधले लोक दाखवण्यासाठी त्याने मध्य आशियामधलं वाटेल असं संगीत घेतलं होतं. तिसऱया थीममध्ये सैनिक आणि कबिला यांचा प्रवास दाखवणारं संगीत येत होतं.
या रचनेतल्या तिन्ही थीम्स नंतर एकमेकांत मिसळून जातात. शेवटच्या भागात एकाच वेळी या तिन्ही थीम्स येतात, पण एकाच वेळी वेगवेगळ्या थीम्स आल्या तरी ते संगीत कुठेही कर्कश होत नाही. रचनेच्या शेवटी संगीताचा आवाज कमी होत जातो. कबिला आणि सैनिक प्रवास करत आपल्यापासून लांब जातायत असं वाटायला लागतं. या वेळी बासरीवर रशियन सैनिकांची थीम वाजत रचनेचा शेवट होतो.
बोरडीनची ही रचना 1880 च्या एप्रिल महिन्यात एका कार्पामात सादर करण्यात आली. अर्थातच श्रोत्यांना ही रचना आवडली. पुढच्याच महिन्यात तो एका कामानिमित्त जर्मनीमध्ये गेला. तिथे त्याला विश्वविख्यात पियानो वादक आणि संगीतकार असणाऱया लीस्टला भेटायचं होतं. लीस्टला भेटल्यावर त्याने आपली रचना दाखवली. लीस्टला ही रचना इतकी आवडली की, बोरडीनने ही रचना लीस्टला समर्पित केली.बोरडीनची ही रचना आजही इतकी लोकप्रिय का असावी हे पाहण्यासाठी आपण Yotubeवर In the Steppes of Central Asia हे संगीत एकदा तरी ऐकायलाच हवं.