Musheer Khan ची धमाकेदार फलंदाजी, 33 वर्षांपूर्वीचा सचिन तेंडुलकरचा विक्रम काढला मोडीत

Dulleep Trophy मध्ये पहिल्यांदाच खेळत असणाऱ्या मुशीर खान हिंदुस्थान ‘ब’ संघाचा संकटमोचक ठरला आहे. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात धमाकेदार फलंदाजी करत 183 धावा चोपून काढल्या. त्याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम सुद्धा मोडला आहे.

मुशीर खानने कठीण परिस्थितीमध्ये संघाचा डाव सावरत पहिल्या दिवशी शतक ठोकले. त्याची ही चमकदार कामगिरी दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सुद्धा कायम राहिली. एका बाजूने विकेट पडत असताना मुशीर खानची संयमी फलंदाजी संघासाठी महत्वाची ठरली. मुशीरने 373 चेंडूंचा सामना करत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 181 धावा केल्या. कुलदीप यादवने त्याला बाद केले. 19 वर्षीय मुशीर खान द्वीशतक झळकवण्यात अयशस्वी ठरला असला तरी त्याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा 33 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.

मुशीर खान दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात पदार्पणात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. त्याने 1991 साली पश्चिम विभागाकडून खेळताना 159 धावा केल्या होत्या. मात्र आता मुशीर खानच्या 181 धावांमुळे त्याचा हा विक्रम मोडीत निघाला आहे. दुलीप ट्रॉफीमध्ये पदार्पणात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबा अपराजित (212 धावा) पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तर दुसऱ्या नंबरवर विनोद कांबळी (208 धावा) त्यानंतर यश धुल (193 धावा), मुशीर खान (181 धावा), अजिंक्य रहाणे (172 धावा) आणि सहव्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर (159 धावा) यांचा समावेश आहे.