नंदुरबारमध्ये बांबूच्या झोळीत महिलेची प्रसूती झाल्याची घटना ताजी असताना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील खासगी निवासस्थानापासून अवघ्या दीड तासावर असलेल्या मुरबाडमध्येही असाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. मुरबाड तालुक्यातील कातकरी पाड्यावरील चित्रा जाधव (26) या महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्याने नातेवाईकांसह गावकऱ्यांनी डोली करून मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. धो धो पाऊस आणि डोंगरदऱ्यातील निसरड्या पायवाटा तुडवत चित्राला मुरबाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर काही वेळातच चित्राने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र बाळ-बाळंतीण सुखरूप असले तरी मुरबाडकरांच्या नशिबी आलेला डोली प्रवास थांबणार कधी, असा सवाल विचारला जात आहे. कोट्यवधींच्या जाहिरातबाजी करून मिंधे सरकार ‘शासन आपल्या दारी’ मोहीम राबवत आहे. मात्र विकासाच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांचा पुरता विचका उडाल्याने डोंगरदऱ्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासींना रोजच नरकयातना भोगव्या लागत आहेत.