मुंबईच्या सौंदर्यीकरणाचा रंग उडाला, महापालिका करणार कडक तपासणी

मुंबईच्या सौंदर्यीकरणाच्या नावाखाली केलेल्या सौंदर्यीकरणाचा आता बोजवारा उडाला असून वर्षभरात 715 कोटी रुपयांचा चुराडा झाला आहे. मुंबईभरातील लाईटचे खांब आणि झाडांवर केलेल्या लायटिंग अनेक ठिकाणी बंद असून रंगवलेल्या भितींचा कलरही फिका पडला आहे. सौंदर्यीकरणाच्या उपक्रमात 994 कामे करण्यात आली आहे. या प्रकारामुळे या सर्व कामांची तपासणी पालिका प्रशासनाकडून करण्यात येणार असून बेजबाबदार पंत्राटदारांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्य सरकारने मुंबईच्या सौंदर्यीकरणाची घोषणा करीत प्रसिद्धीसाठी तब्बल दोन वेळा या कामांचे उद्घाटन केले. यानंतर उन्हाळय़ात अत्यंत संथगतीने कामे करण्यात येत होती. ‘जी-20’ परिषदेच्या निमित्ताने मुंबईतील बैठकीसाठी येणाऱया प्रतिनिधींसमोर दिखावा करण्यासाठी या काळात मोठय़ा प्रमाणात कामे करण्यात आली. मात्र पावसाळय़ात आता या कामांचा रंग उतरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. रस्त्याच्या दुतर्फा केलेली लायटिंग अनेक ठिकाणी बंद असून काही ठिकाणी याच्या वायर धोकादायकरीत्या लटकत आहेत, तर पोलवर केलेली लायटिंगही बंद आहे. वाहतूक बेटांची स्थितीदेखील अनेक ठिकाणी अशीच झाली आहे. त्यामुळे पालिकेने केलेला खर्च वाया गेल्याची टीका करण्यात येत आहे.

सरकारने 1700 कोटी दिलेच नाहीत
राज्य सरकारने या वर्षी अर्थसंकल्पात मुंबईच्या सौंदर्यीकरणासाठी 1729 कोटींची तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले, मात्र यातील कोणत्याही प्रकारचा निधी सरकारने पालिकेला अद्याप दिलेला नाही. असे असताना पालिकेने आतापर्यंत सुमारे 500 कोटींचा खर्च पालिकेने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारने केवळ श्रेय घेण्यासाठी पालिकेची आणि जनतेच्या डोळय़ात धूळफेक केली का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

असे होतेय काम
मुंबईतील रस्ते, वाहतूक बेटांची दुरुस्ती-सौंदर्यीकरण, रस्त्याच्या दुतर्फा पोलवर-झाडांवर आकर्षक लायटिंग, फुटपाथ दुरुस्ती-सुधारणा, भिंतींना रंग-चित्रकला, उद्यानांमध्ये सुधारणा-लायटिंग अशी कामे करण्यात येत आहेत.
यामध्ये एकूण 1285 कामे प्रस्तावित आहेत. यातील 994 कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये मुंबई शहर विभागात 319 तर दोन्ही उपनगरात मिळून 675 कामे करण्यात आली आहेत. शिल्लक कामे लवकरच पूर्ण केली जातील, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.