नगर पालिका आयुक्तांवर लाचलूचपत विभागाने निष्पक्ष चौकशी करावी; आंबेडकरी समाजाकडून पोलीस अधीक्षकांना निवेदन

नगर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचलूचपत विभागामार्फत झालेली कारवाई निष्पक्ष व्हावी. महानगरपालिकेसमोर जातीय मानसिकतेतून असुरी आनंद साजरा करणाऱ्या व्यक्तीवर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे उप पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नगर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्यावर लाचलूचपत विभागाने कारवाई केली. ज्यात आयुक्त दोषी आहेत की नाही हा न्यायप्रविष्ठ विषय असून सदरील कारवाई ही निष्पक्ष व्हावी. जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समस्त आंबेडकर समाजाच्या वतीने करण्यात आली असून प्रामुख्याने आयुक्त मागासवर्गीय बौद्ध समाजाचे असल्याने जाणीवपूर्वक जातीय मानसिकतेतून काही महाभागांनी शहरातील आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावतील असे कृत्य केले. ज्यात कोणी पालिकेच्या आवारात फटाके फोडले तर कोणी पेढे वाटले काहींनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून आनंद व्यक्त केला. या सर्व प्रकाराने शहरातील आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या असून संबंधितांवर ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी अजय साळवे, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, सुनील शेत्रे, नगरसेवक राहुल कांबळे, रोहित आव्हाड, सिद्धार्थ आढाव, सिद्धार्थ भिंगारदिवे, सुजन भिंगारदिवे, कौशल गायकवाड, संजू जगताप, योगेश साठे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, नितीन कसबेकर, भाऊसाहेब देठे, गौतमी भिंगारदिवे, शोभा गाडे, रमेश सानप, सतीश साळवे, वैभव जाधव, सागर ठोकळ, विशाल भिंगारदिवे, गणेश गायकवाड, अमोल गायकवाड, संध्या मेढे, रवी साठे आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.