मुंबईच्या वनसंपदेचा जागतिक परिषदेत ठसा पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा

अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथे 16 ते 20 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडलेल्या शहरी वनसंपदेवर आधारित दुसऱया जागतिक परिषदेत मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत राबविण्यात येणाऱया विविध प्रकल्पांविषयीची दृश्राव्यफित सलग दुसऱयांदा दाखविण्यात आली. या परिषदेत मुंबईतील वनसंपदेची जागतिक पातळीवर चर्चा झाली. शिवाय महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने मुंबईतील वृक्षसंपदा वाढीसाठी हाती घेतलेल्या विविध योजनांचेदेखील मान्यवरांनी कौतुक झाले.

मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून होत असलेल्या प्रयत्नांवर याआधीच जागतिक मोहोर उमटली आहे. ‘जागतिक वृक्ष नगरी 2021 आणि 2022’ या यादीमध्ये मुंबई महानगराचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे सलग दुसऱया वर्षी मुंबईला हा बहुमान प्राप्त झाला आहे. त्यानंतर आता वॉशिंग्टन डीसी येथे 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान शहरी वनसंपदेवर आधारित पार पडलेल्या दुसऱया जागतिक परिषदेत मुंबई महानगरातील वृक्षसंपदा जतन व संवर्धनाचे कौतुक झाले आहे. पालिका आयुक्त प्रशासक इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, उपआयुक्त किशोर गांधी, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांच्याकडून वनीकरणाला चालना दिली जात आहे.

असे वाढतेय वनीकरण
झाडांच्या संगोपनाची जबाबदारी निश्चित करणे, नागरी वने आणि झाडांचे व्यवस्थापन नियंत्रित करण्यासाठी नियम निश्चित करणे, स्थानिक वृक्ष संपदेची अद्ययावत यादी किंवा मूल्यांकन राखणे, वृक्ष व्यवस्थापन योजनेसाठी संसाधनांचे वाटप करणे आणि नागरिकांना शिक्षित करण्यासाठी वार्षिक वृक्ष उत्सव आयोजित करणे अशा बाबी उद्यान विभागाकडून करण्यात येत आहेत. भविष्यातही मुंबईला अधिकाधिक पर्यावरणस्नेही आणि हिरवळीने बहरलेले राखता येईल, असा विश्वास अधीक्षक परदेशी यांनी व्यक्त केला.