सिनेटचा आज निकाल, मतमोजणीला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई विद्यापीठ पदवीधर मतदारसंघाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. सिनेट निवडणूक प्रक्रियेवर गुरुवारी एका याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात आक्षेप घेतला होता, मात्र न्यायालयाने मतमोजणी रोखण्यास स्पष्ट नकार दिला. महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सिनेटच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

युवा सेनेच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 24 सप्टेंबरला सिनेट निवडणूक घेतल्याचे मुंबई विद्यापीठाने गुरुवारी न्यायालयाला कळवले. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली. यावेळी युवा सेनेतर्फे अॅड. सिद्धार्थ मेहता, तर मुंबई विद्यापीठातर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे आणि अॅड. मनीष केळकर यांनी बाजू मांडली. याचदरम्यान एका याचिकाकर्त्याने हस्तक्षेप अर्ज दाखल केला आणि शुक्रवारी होणारी मतमोजणी रोखण्याची विनंती केली. आमची मतदानासंबंधी कागदपत्रे गहाळ झाली आहे. त्यामुळे मतमोजणीला स्थगिती द्या, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वकिलांनी केला. तथापि, हा युक्तिवाद अमान्य करीत खंडपीठाने हस्तक्षेप अर्ज फेटाळला. या निर्णयाने न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवारीच सिनेट निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.

युवा सेनेचा विजय निश्चित

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते, युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना सिनेट निवडणुकीत दहाच्या दहा जागा जिंपून बाजी मारेल, असा विश्वास राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.