मुंबई विद्यापीठ सिनेटच्या मतदार यादीत ‘गोलमाल’,असंख्य नावे यादीतून गायब; शिवसैनिकांनी व्यक्त केला संताप

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीतील वेळकाढूपणा नंतर आता मतदार याद्यांमध्ये गोलमाल करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)आणि युवासेनेने नोंदविलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आली आहेत. यासर्व गोलमाल कार्यपध्दतीचा शिवसैनिकांनी निषेध करत नाराजी व्यक्त केली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणूकीसाठी आज मतदान घेण्यात आले. मतदार म्हणून नाव नोंदणी केलेल्या अनेक मतदारांची नावे मतदारयादीतून गायब झाल्याचे आढळून आले. रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर केंद्रावर सिनेटच्या मतदानासाठी आलेल्या अनेक मतदारांना त्यांचे मतदारयादीत नाव नसल्याने निराश होऊन परतावे लागले. राजापूरचे आमदार राजन साळवी,माजी जि.प.अध्यक्ष विक्रांत जाधव यांचीही नावे मतदारसादीतून गायब झाली.हे दोघेही मतदान केंद्रावर येऊन परत गेले.

जिल्ह्यात फक्त 77 मतदार

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख प्रशांत सांळुखे यांनी सांगितले की, शिवसेना आणि युवासेनेने नोंदविलेल्या अनेक मतदारांची नावे यादीतून गायब करण्यात आली आहेत. आम्ही रत्नागिरी तालुक्यात 400 मतदार नोंदवले होते. आता रत्नागिरी जिल्ह्यात मतदारयादीत फक्त 77 मतदार आहेत. यासर्व प्रकारचा आम्ही निषेध आणि नाराजी व्यक्त करतो असे सांळुखे यांनी सांगितले. यावेळी सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक, तालुका युवाधिकारी प्रसाद सावंत,उपशहरप्रमुख बावा चव्हाण,माजी नगरसेवक नितीन तळेकर,सलील डाफळे आणि अमित खडसोडे उपस्थित होते.

मतदार रत्नागिरीत आणि केंद्र रायगड-सिंधुदुर्गात सिनेट मतदान प्रक्रियेत आणखी एक अजब प्रकार उघडकीस आला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील काही मतदारांचे नाव सिंधुदुर्ग आणि रायगड मधील मतदान केंद्रावरील मतदारयादीत ठेवण्यात आले होते.आता रत्नागिरीतील मतदार मतदानासाठी सिंधुदुर्ग किंवा रायगड जिल्ह्यात मतदानासाठी कसा जाणार असा सवाल युवासैनिकांनी उपस्थित केला.