विद्यापीठ सिनेट निवडणुकीपूर्वीच मनसेमध्ये उमेदवारीवरून बंडखोरी, सुधाकर तांबोळींची अपक्ष उमेदवारी

संपूर्ण राज्याचे लक्ष असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नाही; पण माजी सिनेट सदस्य आणि मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मनसेमध्ये बंडखोरी झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक सुमारे दोन वर्षांनंतर  येत्या 22 सप्टेंबर रोजी पार पडत आहेत. या निवडणुकीत 10 जागांसाठी 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावत आहेत. या निवडणुकीसाठी एकूण 13 हजार 403 मतदारांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांनी प्रचाराची युद्धपातळीवर तयारी सुरू केली आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतील नाराजी आता पुन्हा एकदा उघड झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्व उमेदवार जाहीर करण्यात येतील, अशी घोषणा मनविसे प्रमुख अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केली होती. मात्र या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून एकही अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे मनविसेत प्रचंड नाराजी उफाळली असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने अधिकृत उमेदवार जाहीर केला नसला तरी माजी सिनेट सदस्य आणि मनसेचे सचिव सुधाकर तांबोळी यांनी या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या उमेदवारी अर्जामुळे मनविसेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणुकीपूर्वी ते कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यापूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणूनही त्यांची सिनेटवर नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे आता त्यांच्या या अपक्ष उमेदवारीमुळे राजकीय वर्तुळात मात्र चर्चेला उधाण आले आहे.

पसंतीक्रमानुसार मते

मुंबई विद्यापीठाची सिनेटची निवडणूक ही पसंतीक्रमाच्या मतांनुसार होते. त्यामुळे पहिल्या पसंतीक्रमाच्या मतांबरोबरच दुसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांसाठी जवळपास सर्वच उमेदवारांना जुळवाजुळव करावी लागणार आहे. सुधाकर तांबोळी आणि छात्र भारतीचे रोहित ढाले यांच्या मतांवर अनेकांची मदार असेल. त्यामुळे तांबोळी आणि ढाले यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाची मते आपल्याकडे वळविण्यासाठी येत्या काळात मुंबई विद्यापीठात नवी राजकीय समीकरणे जुळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.