मुंबई विद्यापीठात बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन खुले झाले असून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनांनुसार दुहेरी पदवी, सहपदवी आणि ट्विनिंग पदवीच्या शिक्षणासाठी विद्यापीठाच्या विद्या परिषदेने मंजुरी दिली आहे. आता विद्यार्थ्यांना एकाच वेळी विविध विद्याशाखेंतील शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
दुहेरी पदवीच्या तरतुदींतर्गत दोन्ही डिग्री आता प्रत्यक्ष मोडमध्ये एकाच वेळी घेतल्या जाऊ शकतील. परंतु यासाठी सहभागी महाविद्यालयांनी विद्यापीठाची रीतसर परवानगी घेऊन व शैक्षणिक सामंजस्य करार करणे गरजेचे आहे. तसेच दुहेरी पदवीच्या शिक्षणक्रमांतर्गत सहभागी संस्था/ विद्यापीठांनी क्रेडिट्स किंवा कोर्सेसची ओव्हरलॅपिंग होणार नाही याची खात्री करणे आवश्यक राहील. त्याचबरोबर प्रत्यक्ष मोडमध्ये दुहेरी पदवीच्या शिक्षणासाठी दोन्ही संस्थांमधील अंतर हे एकमेकांपासून 5-20 कि.मी. च्या अंतरावर असावे लागणार आहे.
मुंबई विद्यापीठाने सहपदवीच्या शिक्षणासाठी सेंट लुईस आणि मॉस्को स्टेट विद्यापीठांशी शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, तर ट्विनिंग डिग्रीसाठी फ्रान्स आणि इटली येथील विद्यापीठांशी करार केलेले असून अनेक आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण संस्था व विद्यापीठांशी करारांची प्रक्रिया सुरू आहे.
प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ