आनंदाची बातमी… तानसा तलाव ओव्हर फ्लो, मुंबईकरांसाठी फेबुवारीपर्यंतचे पाणी साठले

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱया सात धरणांमधील महत्त्वाचा असलेला तानसा तलाव आज दुपारी 4 वाजल्यापासून ओसंडून वाहू लागल्याने मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी मिळाली आहे. सद्यस्थितीत सातही तलावांत एकूण 841396 दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला दररोज होणारा 3850 दशलक्ष लिटर पाणीसाठा पाहता हे पाणी पुढील 218 दिवसांसाठी म्हणजेच फेब्रुवारीअखेरपर्यंत पुरणारे आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया तलावांतील तुळशी तलाव 20 जुलैपासून ओव्हर फ्लो झाला आहे. तर आज त्यापाठोपाठ तानसा तलावदेखील ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळय़ात मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाटय़ाने वाढली असून आज सकाळी 6 वाजता करण्यात आलेल्या मोजणीनुसार सर्व सातही तलावांमध्ये त्यांच्या एकूण क्षमतेच्या 58.58 टक्के इतका जलसाठा आहे. मुंबईला मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी 14 लाख 47 हजार 343 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. यंदा जून महिन्यात पावसाने धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईत 5 जूनपासून 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मात्र जुलै महिन्यापासून पावसाची जोरदार इनिंग सुरू झाल्याने पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

…तरीही 10 टक्के पाणीकपात सुरूच राहणार

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सातही तलावांतील पाणीसाठा या वर्षीच्या उन्हाळय़ात 5 टक्क्यांपर्यंत खाली गेल्याने मुंबईत 10 टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. यानंतर पूर्ण जून महिन्यात तलावक्षेत्राकडे पावसाने पाठ फिरवली. मात्र सद्यस्थितीत समाधानकारक पाऊस होत असला तरी तलाव सर्व तलाव पूर्ण भरलेले नाहीत. त्यामुळे अजून काही दिवस वाढणाऱया पाणीसाठय़ाचा आढावा घेतल्यानंतरच 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात येईल, असे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सांगितले.

अशी आहे तानसा तलावाची क्षमता

आज ओसंडून वाहू लागलेल्या तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता ही 14,508 कोटी लिटर (145080 दशलक्ष लिटर) एवढी आहे. हा तलाव गतवर्षी 26 जुलै 2023 रोजी पहाटे 4.35 वाजता, तर वर्ष 2022 मध्ये 14 जुलै रोजी रात्री 8.50 वाजता आणि 2021 मध्ये 22 जुलै रोजी पहाटे 5.48 वाजता तर 20 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 7.05 वाजता पूर्ण भरून वाहू लागला होता.

असा जमला पाणीसाठा

अप्पर वैतरणा 57670 दशलक्ष लिटर 25.40 टक्के

मोडक सागर 106983 दशलक्ष लिटर 82.98 टक्के

तानसा 139691 दशलक्ष लिटर 96.26 टक्के

मध्य वैतरणा 102585 दशलक्ष लिटर 53.01 टक्के

भातसा 400665 दशलक्ष लिटर 55.88 टक्के

विहार 25798 दशलक्ष लिटर 93.14 टक्के

तुळशी 8046 दशलक्ष लिटर 100 टक्के