पोलीस महिलांवरील अत्याचाराची सखोल चौकशी, उपायुक्त विशाल ठाकूर यांनी दिली माहिती

मुंबई मोटर वाहन विभागातील महिला पोलीस चालकांवर झालेल्या कथित अत्याचार प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून लवकरच सत्य काय ते बाहेर येईल, असे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी एक व्हिडीओ प्रसारित करून स्पष्ट केले आहे.

उपायुक्त ठाकूर म्हणतात, आपल्यावर अत्याचार झाला, वरिष्ठ अधिकाऱयांनी लैंगिक शोषण केले असे जे पत्र व्हायरल झाले आहे ते पत्र मुख्यमंत्री किंवा पोलीस आयुक्तांना त्या मुलींनी दिले नसल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे; परंतु त्यातील सत्य काय आहे हे आम्ही लवकरच उघड करू, असेही विशाल ठाकूर यांनी आपल्या खुलाशात म्हटले आहे.

उपायुक्तांच्या या प्रतिक्रियेवर बोलताना एक अधिकारी म्हणाला, पत्रावर जरी मुलींनी सहय़ा केल्या नसल्या तरी मुलींचे लैंगिक शोषण नक्की झाले आहे. याची उच्चस्तरीय गुप्तपणे चौकशी झाल्यास सत्य काय ते बाहेर येईल; परंतु मोटार वाहन विभागातील मुलींवर अत्याचार झाले आहेत एवढे नक्की, असेही या अधिकाऱयाने सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सर्व प्रकाराची सखोल चौकशी करून आयोगाला तत्काळ अहवाल पाठवावा, असे पोलीस आयुक्तांना पत्र लिहिले आहे

नायगावच्या सशस्त्र विभागातही महिला पोलिसावर अत्याचार

मुंबई पोलिसांच्या मोटर वाहन विभागात कार्यरत महिला पोलिसांना लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागल्याचे वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर पोलीस दलातील महिला आपल्यावरील अन्यायाबाबत दाद मागण्यास पुढे येत आहेत. नायगाव येथील सशस्त्र पोलीस विभागाच्या कार्यालयात कार्यरत पोलीस शिपाई महिलेने तिच्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

विजय वडेट्टीवार यांनीच यासंदर्भात आज माहिती दिली. अश्लील शेरेबाजी करणे, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडिओ बनवणे, अश्लील हावभाव करून विनयभंग करणे अशा त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकाराबाबत वरिष्ठांकडे सबंधित पोलिसाची तक्रार केल्यानंतर त्यावर कारवाई होण्याऐवजी आपल्यालाच वरिष्ठांनी मानसिक त्रास दिला असे या महिलेने नमूद केले असल्याचे वडेट्टीवार यांनी सोशल मिडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

महिला पोलीसच सुरक्षित नाहीत मग सामान्य महिलांचे काय?

राज्याच्या पोलीस दलात महिलांची मोठी संख्या आहे. पण महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या गृहखात्याकडे आहे त्या खात्यामधील महिला कर्मचारीच सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिल्यांचा सुरक्षेची काय स्थिती असेल याचा अंदाज न लावलेला बरा, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. पोलिस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचायांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

आरोपींवर कठोर कारवाई करा

पोलीस दल, सत्ताधायांकडून न्याय मिळत नसल्यामुळे पोलीस शिपाई महिलेला न्यायासाठी राज्याच्या विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहावे लागते यावरून सध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे स्पष्ट होते, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. पोलिस दलात महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने आता तरी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून महिलेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

गृह खात्याची निष्क्रियता याला कारणीभूत

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी ‘सामना’ची बातमी टॅग करत या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली. या राज्यात कायद्याचे रक्षकच भक्षक बनले आहेत. याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत आहे. जिजाऊ माँसाहेब, सावित्रीमाई आणि अहिल्यादेवींच्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी ही घटना घडत असताना गृहविभाग यामध्ये कोणतीच कठोर भूमिका घेताना दिसत नाही. या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे, सत्य समोर आलं पाहिजे. कोणताही मुलाहिजा न ठेवता या नराधमांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली.