दिवाळीत मुंबईकरांची लाहीलाही, पहाटेचे तापमान 26 अंशांवर जाणार

दिवाळी सण म्हटले की सोबतीला थंडी असतेच. यंदा ऑक्टोबर सरत असतानाही मुंबईत थंडी दाखल झालेली नाही. उलट ‘दिवाळी पहाट’सह आठवडाभर मुंबईतील पहाटेचे तापमान 26 अंशांच्या पुढेच राहणार आहे. त्यामुळे दिवाळीत थंडीऐवजी मुंबईकरांची लाहीलाही होणार आहे. दिवसाचे तापमानही 35 अंशांच्या आसपास राहणार आहे.

हवामानशास्त्र विभागाकडील नोंदीनुसार, बुधवारी सांताक्रुझमध्ये किमान तापमानात तीन अंशांची मोठी वाढ झाली आणि पारा 24.5 अंशांवर झेपावला. तसेच कमाल तापमान 35 अंशांच्या पातळीवर गेले होते. कुलाब्यातील किमान तापमान 27 अंशांवर पोहोचले होते. त्यामुळे पहाटेपासून संपूर्ण दिवसभर मुंबईकर उकाडय़ाने त्रस्त झाले. ही स्थिती पुढील आठवडाभर कायम राहील. किमान तापमान 25 ते 26 अंशांवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईचे किमान तापमान 21 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यावेळी हवेत गारवा निर्माण झाल्यानंतर थंडीची चाहूल लागली होती, पण तो गारवा दोन दिवसांतच गायब झाला. दिवाळी सुरू होऊनही थंडीचा पत्ता नसल्याने मुंबईकर हिरमुसले आहेत.

फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ

दिवाळी सुरु होऊन दोन दिवस उलटत नाही तोच फटाक्यांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याचे चित्र आहे. शहराच्या तुलनेत उपनगरांतील प्रदूषण चिंतेचा विषय बनले आहे. आधीच उकाडा, त्यात फटाक्यांपासून प्रदूषण वाढल्याने मुंबईकरांची घुसमट सुरू झाली आहे. सकाळच्या सुमारास हवेत धुरके पसरत असल्याने त्याचा आजारी लोकांना अधिक त्रास होत आहे. वातावरणातील विचित्र बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रकृतीची काळजी घेण्याचा सल्ला पालिकेने दिला आहे.