कुर्ल्यात सोमवारी रात्री एलबीएस मार्गावर अंजुमन इस्लाम शाळेसमोर ‘बेस्ट’च्या भरधाव बसने तब्बल 70 वाहनांना चिरडले. या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता सातवर पोहोचला असून या दुर्घटनेत तब्बल 49 जण जखमी झाले आहेत. मिनी बस चालवणाऱ्या कंत्राटी बसचालकाला मोठी इलेक्ट्रिक बस चालवण्याचा अनुभव नसताना केवळ तीन दिवसांचे ट्रेनिंग देऊन त्याच्याकडे गाडी सोपवल्यामुळेच हा भीषण अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ‘बेस्ट’च्या नियमित ड्रायव्हरना भरती करताना याआधी दीड महिन्याचे ट्रेनिंग दिल्यानंतरच रस्त्यावर गाडी चालवण्याची ड्युटी देण्यात येत होती.
या दुर्घटनेप्रकरणी आरोपी ड्रायव्हरला कुर्ला न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून ‘बेस्ट’ प्रशासनानेदेखील तीन सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे. या समितीला दोन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
‘बेस्ट’ उपक्रमाच्या कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 332 या भाडेतत्त्वावरील बसच्या चालकाने रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला पश्चिमेकडील डेपोतून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 500 मीटरनंतर प्रचंड वेग घेतला. या बसने थेट 300 मीटर सुस्साट जात 60 ते 70 वाहनांचा अक्षरशः चक्काचूर केला. यामध्ये रिक्षा, टॅक्सी, खासगी कार, दुचाकी आणि सायकलचा समावेश आहे. यात 50 ते 60 जणांना चिरडले. यात सातजणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे मुंबईची जीवनवाहिनी असणाऱ्या ‘बेस्ट’ प्रवासावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, आरोपी ड्रायव्हर संजय मोरे याच्या चौकशीतूनच अपघाताचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
ड्रायव्हर दारू प्यायला नव्हता!
चालकाकडे अवजड वाहन चालवण्याचा परवाना होता. त्याने गाडी चालवताना दारूदेखील प्यायली नव्हती, अशी माहिती बेस्ट महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी दिली. ड्रायव्हरला ट्रेनिंग दिले होते, असेही ते म्हणाले. मोरे चार वर्षांपासून ऑलेट्रा कंपनीच्या भाडेतत्त्वावरील गाड्यांवर ड्रायव्हर म्हणून काम करीत असल्याची माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली.
मृतांना सात लाखांची मदत
कुर्ला बस दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई म्हणून राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर ‘बेस्ट’ प्रशासनानेही प्रत्येकी दोन लाखांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये जखमींवरील उपचाराचा खर्च पालिका आणि बेस्ट उपक्रमाकडून उचलला जाणार आहे.
पोलिसांनी मागितले 7 दिवस, कोर्टाने दिली 11 दिवस कोठडी
बस चालक संजय मोरेला मंगळवारी कुर्ला न्यायालयात हजर केले होते. आरोपी मोरेने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. अपघात घडला, त्यावेळी मोरेने अंमली पदार्थाचे सेवन केले होते का? हा कट होता का? त्यात आणखी कोणी सहभाग आहे का? घातपाताचा भाग म्हणून बेस्ट बसचा ’शस्त्र’ म्हणून वापर केला का? याचा अधिक तपास करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मोरेला 7 दिवस पोलीस कोठडी द्या, अशी विनंती पोलिसांनी केली. त्यावर मोरेचे वकील समाधान सुलाने यांनी आक्षेप घेतला. दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकारी एस. एम. गौरगोंड यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष घेत संजय मोरेला 7 दिवसांऐवजी 11 दिवसांची कोठडी (21 डिसेंबरपर्यंत) सुनावली.
मृतांची नावे
कनीज अन्सारी ( 55), आफरीन शाह ( 19), अनम शेख (20), शिवम कश्यप ( 18), विजय गायकवाड ( 70), फारुख चौधरी ( 54), कनीज़ फातिमा (38)
डेपो बंद ठेवल्याने प्रवाशांचे हाल
कुर्ला स्थानकातून बीकेसी, अंधेरी, सांताक्रुझसह दक्षिण मुंबईत बस सोडल्या जातात. बस दुर्घटनेनंतर खबरदारी म्हणून कुर्ला बस डेपो आज दिवसभर बंद ठेवण्यात आला. त्यामुळे सकाळपासूनच कामावर जाणाऱ्या आणि इतर प्रवाशांचे मोठे हाल झाले.
बेस्टच्या ताफ्यात नव्याने आलेल्या इलेक्ट्रिक गाड्या या ऑक्सिलेटर, रेजर आणि ब्रेक यावर चालतात. चालक नवीन असल्यास किंवा गाडी चालवताना त्याची मनःस्थिती स्थिर नसल्यास आणि ब्रेकऐवजी रेजरवर पाय दाबून धरल्यास गाडी सुस्साट जाऊ शकते. त्यामुळे अपघातही होऊ शकतो, असे तज्ञांकडून सांगण्यात आले.
दोन वर्षांत ‘बेस्ट’च्या धडकेत 62 जणांचा मृत्यू, एकूण 247 अपघात
रेल्वेनंतर मुंबईची दुसरी ‘लाइफलाइन’ असलेल्या ‘बेस्ट’च्या अपघातात गेल्या दोन वर्षांत तब्बल 62 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 2022-23 पासून आतापर्यंत बेस्टचे एकूण 247 अपघात झाले असून यामध्ये 143 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पादचारी, प्रवासी आणि रस्त्यावर चालणारे नागरिक, वाहनचालकांचा समावेश आहे.