मुख्यमंत्र्यांचा पाहणी दौरा ठरला फार्स; मुंबई – नाशिक महामार्गावरील भरलेले खड्डे तासाभरात पुन्हा उखडले

मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. मुंबई-नाशिक या अवघ्या अडीच तासांच्या प्रवासासाठी सात ते आठ तास लागतात. महामार्गावरील खड्ड्यांवरून टीकेची झोड उठताच मुख्यमंत्र्यांनी आज अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन मुंबई-नाशिक महामार्गाची पाहणी केली. मात्र हा पाहणी दौरा केवळ फार्स ठरला. मुख्यमंत्र्यांच्या समोर खड्डे भरण्याचे नाटक करण्यात आले असले तरी त्यांची पाठ फिरताच अवघ्या तासाभरात पुन्हा खड्डे उखडले. त्यामुळे वाहनधारकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मुंबई-नाशिक महामार्गावर खड्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना तासन्तास वाहतूककोंडीत अडकून राहावे लागत आहे. सरकारला हायवे नीट करता येत नसेल तर ते सर्वांगीण विकास काय करणार, अशी टीका चोहोबाजूंनी झाल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी-ठाणे बायपास मार्गे वासिंद, शहापूरपर्यंत पाहणी दौरा केला. यावेळी ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष खड्डे भरण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. हे खड्डे पावसाळा संपेपर्यंत उखडणार नाहीत, अशी शेखी मिरवली. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच भरलेले खड्डे उखडून खडी रस्त्यावर आली. त्यामुळे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे फलित झाले.

कसारा घाटाकडे फिरकलेच नाहीत
पाहणी दौऱ्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम, रस्ते विकास महामंडळ, टोल प्राधिकरणाचे अधिकारी होते. मुंबई-नाशिक महामार्गाची वाताहत पाहून मुख्यमंत्र्यांनी शहापूरमधूनच मुंबईकडे प्रयाण केले. कसारा घाट वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कसारा घाट पाहणी दौरा गुंडाळल्याची चर्चा घटनास्थळी होत होती.