रॉयल क्लबला पालिका देणार 100 कोटी; मुंबईकरांत संताप

रेसकोर्सची 120 एकर जागा 20 जुलै रोजी पालिकेच्या ताब्यात आली असली तरी मुंबई सेंट्रल पार्क तयार करताना बाधित होणाऱ्या 650 पैकी 25 टक्के तबेल्यांच्या बदल्यात पालिका रॉयल क्लबला 100 कोटी रुपये नुकसानभरपाईच्या नावाखाली देणार आहे. पालिकेने रॉयल क्लबला मुंबईकरांच्या हक्काचे पैसे देऊ नये अशी मागणी नागरिकांकडून केली जात असताना पालिकेने रॉयल क्लबला 100 कोटी देण्यावर ठाम असल्याने संताप व्यक्त होत आहे.

रेसकोर्स येथील रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबने 92.61 एकर जागेचे भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणानंतर रॉयल क्लबने नव्या दरानुसार 1.27 कोटींचे भाडे पालिकेकडे भरले आहे. या ठिकाणी 120.20 एकर जागेवर मुंबईकरांसाठी सर्व सुविधांनी युक्त मुंबई सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे. मात्र पालिकेच्या ताब्यात दिलेल्या जागेमधील 650 पैकी सुमारे 160 तबेले बाधित होणार आहेत. त्यामुळे हे तबेले नव्याने बांधण्यासाठी पालिकेने 100 कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी रॉयल क्लबकडून करण्यात आली आहे. याला पालिकेने सकारात्मक प्रतिसाद देत 100 कोटी रुपये देण्याचे कबूल केले आहे. लवकरच ही रक्कम रॉयल क्लबला देण्यात येणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

बाधित झोपडपट्टीवासीयांचे एसआरएकडून पुनर्वसन

पालिकेच्या ताब्यात आलेल्या भूखंडाजवळच सुमारे 425 झोपडय़ा आहेत. मुंबई सेंट्रल पार्क बनवताना या झोपडय़ा हटवण्यात येणार आहेत. या झोपडपट्टीवासीयांच्या पुनर्वसनासाठी प्लॅन तयार करून एसआरएच्या माध्यमातून त्यांना पर्यायी घरे देण्यात येणार असल्याच माहिती पालिकेकडून देण्यात आली. यासाठी सल्लागार नेमण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.