पालिकेच्या नऊ हजार सफाई कामगारांना एक रुपया पगार;  कर्मचाऱयांमध्ये संताप, संघटना आक्रमक

पालिकेच्या नऊ हजार कर्मचाऱयांना मार्च महिन्याचा पगार फक्त एक रुपया जमा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांसमोर कुटुंब कसे चालवणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संबंधित कर्मचाऱयांनी आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसल्याचे सांगत पगार कापल्याचे स्पष्ट केले आहे. याची गंभीर दखल घेत कर्मचाऱयांचा पगार तातडीने द्यावा, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेने पालिका आयुक्तांकडे केली.

पॅन व आधार कार्ड लिंक करणे आयकर विभागाने बंधनकारक केले आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेने आपल्या खाते प्रमुखांना अवगत केले होते. यानुसार पालिकेच्या सुमारे 1 लाख 2 हजार कर्मचाऱयांपैकी सुमारे 93 हजार कर्मचाऱयांनी आपले पॅन व आधार कार्ड लिंक केले. मात्र घनकचरा विभागातील तब्बल 9 हजारांपेक्षा जास्त सफाई कामगारांनी आपले पॅन कार्ड व आधार कार्ड लिंक केले नाही. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या मार्च महिन्याचा पगार कापला असून खात्यावर फक्त एक रुपया जमा केला आहे. याची दखल घेत म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम, उपाध्यक्ष संजय कांबळे-बापेरकर यांनी आयुक्तांना निवेदन देऊन पगार तातडीने कर्मचाऱयाच्या खात्यावर जमा करण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ

पालिकेच्या सफाई खात्यात काम करणारे अनेक कर्मचारी अल्पशिक्षित असल्याने त्यांचे आधार-पॅन कार्ड लिंक करण्याची जबाबदारी संबंधित खात्याने करणे अनिवार्य होते. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने कर्मचाऱयांचा पगार कापल्याचे म्युनिसिपल कर्मचारी सेनेने म्हटले आहे.

पालिका प्रशासन म्हणते

n आधार व पॅन कार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च हा शेवटचा दिवस होता. याबाबत टीव्ही व वर्तमानपत्राद्वारे माहिती प्रसारित केली होती. तरीही कामगारांनी आधार व पॅन कार्ड लिंक केले नसल्याने पगार कापला आहे.

n दरम्यान, आधार-पॅन लिंक करण्यासाठी किमान आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणे अपेक्षित असल्यामुळे कामगारांच्या हातात पगार पडायला किमान 15 ते 20 एप्रिल उजाडणार आहे.