मालमत्ता कर वसुली टार्गेटच्या 1 हजार 305 कोटींनी हुकली

आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत पालिकेने 3 हजार 195 कोटी 91 लाख 11 हजार रुपये वसूल केले आहेत. या वर्षी पालिकेने 31 मार्चपर्यंत साडेचार हजार कोटी मालमत्ता कर वसुलीचे टार्गेट ठेवले होते. मात्र वसूल झालेली रक्कम पाहता टार्गेटच्या तुलनेत 1 हजार 305 कोटी रुपयांची कमी वसुली झाल्याचे समोर आहे.

‘मालमत्ता कर’ हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे. पालिका हद्दीत एकूण मालमत्तांची संख्या 9 लाख 55 हजार 38 इतकी आहे. यापैकी 500 चौरस फूट (46.45 चौरस मीटर) व त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱया निवासी इमारती / निवासी सदनिकांना मालमत्ता करातून संपूर्ण सूट दिली आहे. या मालमत्तांची संख्या 3 लाख 56 हजार 652 इतकी आहे. तर, उर्वरित 5 लाख 98 हजार 386 मालमत्तांना कर आकारणी केली जाते. ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत पालिकेकडे भरणा करावा यासाठी पालिकेच्या करनिर्धारण व संकलन खात्याने वर्षभर प्रयत्न केल्याने 3 हजार 195 कोटी वसूल झाल्याची माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे यांनी दिली आहे. करनिर्धारण व संकलन विभागाकडून आर्थिक वर्ष 2023-2024 ची सुधारित मालमत्ता कर देयके फेब्रुवारी 2024 अखेरीस पाठवल्यानंतर निर्धारित कालावधीत कर भरण्याबाबत नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात आले. निर्धारित कालावधीत नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा करता यावा यासाठी सुट्टींच्या दिवशी नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्यात आली.

या दिवशी झाली सर्वाधिक वसुली

19 मार्च रोजी एकाच दिवसात तब्बल 100 कोटी रुपये, 28 मार्च रोजी 304 कोटी रुपये, 29 मार्च रोजी 171 कोटी रुपये, 30 मार्च रोजी 171 कोटी रुपये आणि 31 मार्च रोजी 190 कोटी 34 लाख रुपयांचे विक्रमी संकलन करण्यात करनिर्धारण व संकलन विभागाला यश आले.

वांद्रे पूर्वमध्ये सर्वाधिक वसुली

1 एप्रिल, 2023 ते 31 मार्च, 2024 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक मालमत्ता कर संकलन हे ‘एच पूर्व’ विभागामध्ये रुपये 336.45 कोटी इतके झाले आहे. त्याखालोखाल ‘के पूर्व’ अंधेरी विभागामध्ये 317.48 कोटी रुपये इतकी, ‘जी दक्षिण’ विभागामध्ये 257.11 कोटी रुपये मालमत्ता कर संकलन झाले आहे. शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांचा विचार केल्यास सर्वाधिक कर संकलन पश्चिम उपनगरांमध्ये 1,590.09 कोटी रुपये, शहर भागात 917.05 कोटी रुपये आणि पूर्व उपनगरांमध्ये 678.42 कोटी रुपये इतके झाले.