मुंबईमध्ये बांधकामांच्या धुळीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने पाच हजारांवर बांधकामांना नोटीस बजावून प्रदूषण नियम पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे नियम पाळणे बंधनकारक असून सर्व वॉर्डमध्ये यासाठी बांधकामांची झाडाझडती घेतली जाणार आहे. यामध्ये प्रदूषण नियंत्रणाची नियमावली पाळली जात नसल्याचे निदर्शनास आल्यास सुरुवातीला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात येणार आहे. यामध्ये निर्धारित मुदतीत प्रदूषण नियंत्रणाची यंत्रणा उभारली नाही तर बांधकाम ‘सील’ करून ‘काम बंद’ची कारवाई करण्यात येईल, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये प्रदूषणामध्ये वाढ झाली असून हवेची गुणवत्ता खालावल्याचे समोर आले आहे. या प्रदूषणाला बांधकाम प्रकल्पांमधून उडणारी धूळ प्रमुख कारण असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बांधकामांच्या ठिकाणी उडणारी धूळ रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश पालिकेकडून देण्यात येत आहेत. शिवाय प्रदूषणाची इतर कारणे कमी करण्यासाठी गेल्या वर्षी 15 ऑक्टोबर रोजी 27 प्रकारची नियमावली जाहीर करून अंमलबजावणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमावलीत या वर्षी दोन नियमांची वाढही करण्यात आली असून मुंबईत बांधकामाच्या ठिकाणी जेवण बनवण्यासाठी चूल पेटवणे आणि शेकोटी पेटवण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी गेलेला कर्मचारी वर्ग पालिकेच्या सेवेत पुन्हा रुजू झाल्याने या कारवाईला वेग येणार आहे.
अशी आहे नियमावली
n धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे.
n संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी प्रिंकलर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार ते पाच वेळा पाण्याची फवारणी करावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा.
n रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावावीत, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.
मुंबईच्या जंक्शनवर एअर प्युरिफायर
n मुंबईतील महत्त्वाच्या जंक्शनवर वाहनांच्या मोठय़ा प्रमाणामुळे प्रदूषणात वाढ होते. त्यामुळे पालिकेने दहिसर चेक नाका, बीकेसी, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, छेडा नगर चेंबूर, मुलुंड पश्चिम चेक नाका या ठिकाणी एअर प्युरिफायर कार्यान्वित करण्यात आले आहेत.
n हे प्युरिफायर धूळ शोषून घेत शुद्ध हवा बाहेर सोडतात. मुंबईत हीच प्रणाली आणखी पाच महत्त्वाच्या ठिकाणी बसविण्यात येणार आहे. यासाठी ठिकाणे निश्चित करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.