मुंबईकर गोलंदाजांचा बॉलबाला; मुंबईकडे 260 धावांची आघाडी

>>क्रीडा प्रतिनिधी

वानखेडेच्या पाटा खेळपट्टीवर दुसऱया दिवशी मुंबईच्या गोलंदाजांचा ‘बॉलबाला’ दिसल्यामुळे विदर्भाचा पहिला डाव 105 धावांत गुंडाळून यजमानांनी आपल्या 42 व्या रणजी करंडकावर आपली पकड मजबूत केली. विदर्भाचा 105 धावांत खुर्दा पाडल्यामुळे 119 धावांची आघाडी घेणाऱया मुंबईला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि मुशीर खान यांनी वैयक्तिक अर्धशतकांसह तिसऱया विकेटसाठी केलेल्या 107 धावांच्या अभेद्य भागीमुळे संघाची आघाडी 260 वर नेली आहे. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा अजिंक्य 58, तर मुशीर 51 धावांवर खेळत होते.

काल रणजी करंडकाच्या पहिल्या दिवशी मुंबईचा डाव 224 धावांत गुंडाळल्यामुळे विदर्भाच्या गोटात आनंदाचे वातावरण होते; मात्र आपली निरोपाची कसोटी खेळत असलेल्या धवल कुलकर्णीने आघाडीवीरांना बाद करत विदर्भाची 3 बाद 31 अशी दुर्दशा केली होती. त्यामुळे दुसऱया दिवसाचे सत्र दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते आणि तेच ठरले. कुलकर्णीच्या कालच्या दोन हादऱयांनतर आज सकाळचा पहिला धक्काही त्याच्याच चेंडूने दिला. त्याने विकेटची बोहनी केल्यानंतर मुंबईचे गोलंदाज विदर्भाच्या फलंदाजांवर अक्षरशः तुटून पडले.

पहिल्या सत्रातच विदर्भाचे काम तमाम
कुलकर्णीने सलामीवीर तायडेला आपली खेळी फार मोठी करूच दिली नाही. कालच्या धावसंख्येत अवघ्या दोन धावांची भर पाडल्यानंतर कुलकर्णीने त्याला यष्टीमागे हार्दिककडे झेल देण्यास भाग पाडले. मग आदित्य ठाकरे आणि यश राठोड यांनी 40 धावांची भागी रचत विदर्भाला चांगली सुरुवात करून दिली होती. ही जमलेली जोडी शम्स मुलाणीने पह्डली आणि सामन्याचा सारा रंगच बदलला. त्यानंतर पाहुण्यांचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला. 4 बाद 79 अशी स्थितीत असलेला विदर्भ शम्स मुलाणी आणि तनुष कोटियनच्या फिरकीपुढे 105 धावांतच गडगडला. दोघांनी 25 धावांत 6 विकेट घेत विदर्भाला उपाहाराआधीच तंबूत धाडण्याचा पराक्रम केला. कोटियनने तर आपल्या 4.3 षटकांच्या स्पेलमध्ये अवघ्या 7 धावा देत शेवटचे तीन फलंदाज बाद केले. मुलाणीने 32 धावांत 3, तर कुलकर्णीने 15 धावांत 3 विकेटस् टिपल्या.

अजिंक्यला सूर गवसला
यंदाच्या रणजी मोसमात आपला हरवलेला सूर अखेर अजिंक्य रहाणेला जेतेपदाच्या लढतीत गवसला. दुसऱया डावातही मुंबईच्या फलंदाजांनी निराशा केली. या मोसमात मुंबईचे आघाडीवीर वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे संघात चिंतेचे वातावरण असताना आजही त्याचीच भर पडली. पृथ्वी शॉ (11) आणि भूपेन लालवानी (18) यांची दमदार सलामी आजही मुंबईच्या पदरी पडली नाही. यश ठाकूरने पृथ्वीचा त्रिफळा उडवताच मुंबईच्या काळजात धस्स झाले. पुढे भूपेनही हर्ष दुबेचा बळी ठरला. त्यामुळे 2 बाद 34 अशा बिकट अवस्थेत असलेल्या मुंबईला अजिंक्य रहाणेने आधार दिला. त्याने नवोदित मुशीर खानच्या साथीने मुंबईला सावरलेच नाही, तर विदर्भच्या गोलंदाजांना आणखी यश मिळवू दिले नाही.