
दरवर्षी होळीनंतर सुरू होणार उन्हाळा यंदा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवडयातच सुरू झाला आहे. राज्यातील सरासरी तापमान 40 अशांवर पोहचले आहे. तर मुंबई आणि कोकणात उन्हाचे चटके जाणवत असून उष्णतेने अंगाची काहिली होत आहे. आता उन्हाळा सुरू झाल्याने पुढील तीन महिने तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात जाणवणारे उन्हाचे चटके आता फेब्रुवारी महिन्यातच जाणवत आहेत. मुंबई आणि कोकणात मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट जाणवत आहे. मुंबईसह कोकणातील तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपासून 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे.
सध्या पूर्वेकडून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील तापमानात वाढ झाली आहे. या आठवड्यात पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव कमी होणार असून तापमानात थोडीशी घड होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. वाढत्या तापमानासह मुंबई शहरासह उपनगरांत वायू प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहेत. त्यामुळे श्वसनाचे आणि घशाचे आजार बळावत आहेत.
राज्यात मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवड्यातही तापमाात मोठी वाढ झाली आहे. तसेच वाढत्या तापमानाने अनेक जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने जलसाठे कमी होत आहेत. त्यामुळे आगामी काळात तापमानाचा वाढता पारा आणि पाणी टंचाई असे दुहेरी संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.