नव्या वर्षाच्या सुट्टय़ा जाहीर, हायकोर्टाचे कामकाज 132 दिवस बंद

मुंबई उच्च न्यायालयाला नवीन वर्षात 132 दिवस सुट्टी असणार आहे. वर्षभरात जवळपास 36 टक्के दिवस सर्व खंडपीठांमधील कामकाज बंद राहणार आहे. उच्च न्यायालय प्रशासनाने ब्रिटिश परंपरेचे पालन करीत नवीन दिनदर्शिकेच्या माध्यमातून या सुट्टय़ा जाहीर केल्या आहेत. तसेच खंडपीठानुसारही काही विशेष सुट्टय़ांची यादी प्रसिद्ध केली आहे.

उन्हाळी सुट्टीत महिनाभर म्हणजेच 13 मे ते 9 जूनपर्यंत उच्च न्यायालयाचे कामकाज बंद राहील, तसेच दिवाळीत 28 ऑक्टोबरपासून 8 नोव्हेंबरपर्यंत अशी 16 दिवस सुट्टी असेल. दिवाळीपाठोपाठ नाताळनिमित्त दहा दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक मे महिन्यात 23 दिवस उच्च न्यायालयाचे दरवाजे बंद राहणार आहे. या अवधीत पक्षकारांना केवळ तातडीच्या प्रश्नांबाबत सुट्टीकालीन न्यायालयात दाद मागता येणार आहे.

जून, नोव्हेंबर व डिसेंबर या तीन महिन्यांत प्रत्येकी 14 दिवस न्यायालयीन कामकाज बंद असेल. सणांव्यतिरिक्त 52 रविवार तसेच प्रत्येक दुसऱया व चौथ्या शनिवारच्या 26 सुट्टय़ांच्या कालावधीत उच्च न्यायालयाचे कामकाज बंद राहणार आहे.