रवींद्र वायकर यांच्या विजयाला आव्हान, शाह यांच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठापुढे होणार सुनावणी

मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांच्या खासदारकीला आव्हान देत हिंदू समाज पक्षाचे भरत शाह यांनी दाखल केलेल्या याचिकेची उच्च न्यायालयाने मंगळवारी गंभीर दखल घेतली. शाह यांच्यातर्फे अॅड. विनयकुमार खातू यांनी रिट याचिकेचे निवडणूक याचिकेत रूपांतर करण्यासाठी विनंती केली. त्यांच्या विनंतीची दखल घेत न्यायालयाने रजिस्ट्रीला याचिका योग्य त्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शाह यांच्या याचिकेवर लवकरच दुसऱया खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे.

उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी पेंद्रात हेराफेरी करून मिंधे गटाचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी मिळवलेला विजय अवैध घोषित करा, अशी मागणी करीत हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी अॅड. असीम सरोदे, अॅड. विनयकुमार खातू, अॅड. श्रीया आवले, अॅड. बाळकृष्ण निढाळकर, अॅड. किशोर वरक यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. वायकर यांच्या ‘मॅनेज’ विजयासाठी निवडणूक आयोगाने नियम-कायदे धाब्यावर बसवल्याचा गंभीर आरोप याचिकेत केला आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती महेश सोनक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठापुढे मंगळवारी सुनावणी झाली. शाह यांच्या वतीने अॅड. विनयकुमार खातू यांनी युक्तिवाद केला. त्यांनी केलेल्या विनंतीची खंडपीठाने गांभीर्याने दखल घेतली आणि रजिस्ट्रीला योग्य त्या खंडपीठापुढे याचिका सूचीबद्ध करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास तयारी दाखवल्यामुळे रवींद्र वायकर यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.