दाणादाण! मुंबईकरांचे प्रचंड हाल, लोकल कोलमडली… रस्ते रखडले, विमानसेवा विस्कळीत

mumbai rain traffic

महिनाभरापासून प्रतीक्षा करायला लावणाऱया पावसाने आज मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला जोरदार दणका दिल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले. मुंबईतील नालेसफाई आणि राज्यातील पूरस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याबाबत मिंधे सरकार आणि मुंबई पालिकेने केलेले सर्व दावे ‘पाण्या’त गेले. ठिकठिकाणी रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने मध्य आणि हार्बर मार्ग कोलमडून प्रवासी अडपून पडले.

बाहेरगावाहून मुंबईत येणाऱया अनेक एक्प्रेसचीही रखडपट्टी झाली, तर वाहतूक कोंडीमुळे रस्ते वाहतूकही कोलमडली. शिवाय विमान सेवाही विस्कळीत झाल्याने प्रवासी लटकले. राज्याच्या विविध भागांत नद्यांनी धोक्याची पातळी पार केल्याने शेती-घरात पाणी शिरल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

महाराष्ट्रात या वर्षी अगदी वेळेत डेरेदाखल झालेल्या मान्सूनने तब्बल महिनाभर चांगलीच ओढ दिली. मात्र कोकणात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसायला सुरुवात झाली, तर मुंबईत मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला. पावसाची तीव्रता इतकी जास्त होती की, मध्यरात्री 12 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत अवघ्या सात तासांत मुंबईत तब्बल 300 मिमी पाऊस कोसळला. मध्यरात्री सुरू झालेल्या पावसाची कल्पना मुंबईकरांना सकाळी कामावर निघाले तेव्हा आली. मात्र रेल्वेमार्ग बंद असल्याने मध्य, हार्बर रेल्वे स्टेशनवर हजारो प्रवाशांची गर्दी झाली. पश्चिम रेल्वेमार्गावरील गाडय़ाही तब्बल अर्धा तास उशिराने धावत होत्या.

परळ स्थानक अंधारात

सायंकाळी सातनंतर परळ स्थानकात वीज गेली. त्यामुळे आधीच दिवसभर पावसात भिजत ऑफिस ते पुन्हा घरी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले. स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. रेल्वेकडून कोणत्याही प्रकारची उद्घोषणा केली जात नव्हती सीएसएमटीकडे जाणाऱया गाडय़ा परळ स्थानकावर थांबत नसल्यामुळे प्रवासी संतापले.

अंधेरीत रस्ता गेला वाहून

अंधेरी सबवे ते जुन्या नागरदास रस्त्याला जोडणारा मुख्य रस्ता पावसात वाहून गेला आहे. पालिकेने तीन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम केले होते. मात्र रविवारी रात्री झालेल्या पावसात या रस्त्यावरील डांबर वाहून गेले आहे. डांबराचे मोठे तुकडे रस्त्याच्या आजूबाजूला पडले आहेत. त्यामुळे आता पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेच्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न

मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासून तुफान पाऊस सुरू झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पाऊस ओसरल्यानंतर दुपारी पालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट देऊन पत्रकार परिषद घेतली. राज्य आणि पालिकेची आपत्कालीन यंत्रणा अलर्ट मोडवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र पूरस्थिती नियंत्रणासाठी शिवसेनेच्या सत्ताकाळात झालेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. हिंदमाता, मीलन सबवेसारख्या ठिकाणी भूमिगत पाणी साठवण टाक्या, पंपिंग स्टेशन आणि मायक्रो टनेलिंगसारखा प्रयोग आपल्याच काळात झाल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईत 65 मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी झाल्याचे मानले जाते. मात्र काल रात्रीपासून सहा-सात तासांत 267 ते 300 मिमी पाऊस झाल्याचे ते म्हणाले.

शाळा, महाविद्यालये बंद

कोकणात पावसाचा जोर असल्याने कालच शाळा-कॉलेज बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र मुंबईत शाळा बंदचा निर्णय आज सकाळनंतर जाहीर केल्यामुळे मुंबईतील बहुतांशी शाळा सुरूच होत्या, तर दुपारी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आल्याने दुपारच्या सत्रातील सर्व शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या सोमवारी होणाऱया परीक्षाही पावसामुळे पुढे ढकलण्यात आल्या. सोमवारी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत होणाऱया परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. या परीक्षा आता 13 जुलै रोजी होणार आहेत.

वाकोल्यातील आगीत वृद्धेचा मृत्यू

वाकोल्यात शॉर्टसर्पिटमुळे लागलेल्या आगीत शांता आचार्य या 72 वर्षांच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. हाजी सिद्धिकी या चाळीत दुपारी ही घटना घडली. जखमी महिलेला तातडीने व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपराचादरम्यान तिचा मृत्यू झाला.

मदत व पुनर्वसन मंत्रीच अडकले

कोल्हापूरहून रविवारी रात्री निघालेली महालक्ष्मी एक्प्रेस सोमवारी पहाटे मुंबईच्या पावसात अडकली. नियोजित वेळेपेक्षा तब्बल पाच तासांनी ही गाडी मजल दरमजल करत छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात पोहोचली. अंबरनाथ येथे अडकलेल्या या गाडीने 2019 मधील पुराच्या आठवणी जाग्या केल्या. या ट्रेनने येणारे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री खुद्द अनिल पाटील हेच पुर्ला व दादरच्या दरम्यान अडकल्याचे समोर आले. शिवाय, आमदार अमोल मिटकरी यांच्यासह पाच ते सहा आमदार या ट्रेनमध्ये अडकले. अनिल पाटील आणि मिटकरी थेट ट्रेनमधून उतरून मुंबईच्या दिशेने रेल्वेमार्गावरून निघाले.

‘सबवे’त पाणी भरल्याने कोंडी

मुंबईत सबवेमध्ये आणि पाणी तुंबणाऱया ठिकाणचे पाणी उपसण्यासाठी पालिकेने 480 पंप लावल्याचा दावा केला होता. शिवाय सबवेजवळ ‘पाणी साठवण’ टाक्यांचा प्रयोग करीत पाणी तुंबणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र आजच्या पहिल्याच पावसात अंधेरी, मालाड, दहिसर, सांताक्रुझ मीलन सबवेमध्ये पाणी भरल्याने या ठिकाणी बराच काळ वाहतूक ठप्प होती.

पवई तलाव ओव्हरफ्लो , तलाव क्षेत्रात धो धो, दोन दिवसांत महिनाभराचे पाणी साठले

महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर शनिवारपासून सातही तलाव क्षेत्रांत जोरदार पाऊस बरसत आहे. शनिवारी तलाव क्षेत्रात 1,57,449 दशलक्ष लिटर म्हणजेच 10.88 टक्क्यांवर असणारा पाणीसाठा आज सकाळी 6 वाजता 2,71,147 दशलक्ष लिटर म्हणजे 18.73 टक्क्यांवर पोहोचला. मुंबईला दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणी लागते. हे पाहता एक महिना पुरेल इतके पाणी आहे. सातही तलावांत मिळून सध्या पुढील 70 दिवसांचा म्हणजेच सप्टेंबरपर्यंतचा पाणीसाठा आहे.

मुंबईला महानगरपालिकेकडून अपर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून पाणीपुरवठा केला जातो. या तलावांव्यतिरिक्त पवई हा पालिकेने बांधलेला पृत्रिम तलाव आहे. या तलावाचे पाणी पिण्यासाठी वापरले जात नसले तरी औद्योगिक वापरासाठी हे पाणी उपयुक्त ठरते. हा पवई तलाव आज पहाटे 4ः45 वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. 545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱया या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसांत या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.