सतरा वर्षे झाली, मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण करणार? विरोधकांनी सरकारला धरले धारेवर

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला तब्बल सतरा वर्षे होऊनही या रस्त्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने कोकणवासीय, चाकरमान्यांची प्रचंड गैरसोय होत असल्याचा प्रश्न आज विधान परिषदेत आमदार विक्रम काळे मांडला. यावर उत्तर देताना सरकारची चांगलीच कोंडी झाली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी समर्पक उत्तरे दिली नसल्याने शिवसेनेसह सर्व विरोधकांनी सरकारचा जोरदार निषेध करीत तातडीने काम पूर्ण करण्याची मागणी केली. शिवाय सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध करीत सभात्याग केला. यावेळी उपसभापती नीलम गोऱहे यांनी सभागृह एक तासासाठी तहकूब केले.

महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा आणि कोकण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहे. इंदापूर ते झाराप या आराखडय़ास जून 2013 मध्ये पेंद्र शासनाकडून मंजुरी प्राप्त झाली. यानंतर 80 ते 90 टक्के संपादित जागा ताब्यात घेतली असून यावर आतापर्यंत 3374.11 कोटींचा खर्च झालेला असून यातील 75 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत सरकारने सविस्तर माहिती द्यावी आणि संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी केव्हा सुरू करणार हे स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली. यावर मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले उत्तर दिशाभूल करणारे असल्याचे सांगत शिवसेना आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे, विलास पोतनीस यांच्यासह सर्वच विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. सरकारला आम्ही प्रश्नच विचारायचे नाही का, असा सवाल केला. यावेळी झालेल्या गदारोळामुळे सभागृह तहकूब करण्यात आले.

सरकार म्हणते, अधिकारी जबाबदार
550 किमी मुंबई-गोवा महामार्गाचे काम दहा पॅकेजमध्ये सुरू असून वेगवेगळय़ा पंत्राटदारांकडून सुरू असल्याचे यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. या कामाच्या पंत्राटदारांनी सब कॉण्ट्रक्टरना कामे दिल्याने कामात दिरंगाई झाल्याचेही त्यांनी मान्य केले. विशेष म्हणजे काम रखडण्यास अधिकारीवर्ग जबाबदार असल्याचा दावा केला. शिवाय काही ठिकाणच्या भूसंपादनातील कायदेशीर बाबींमुळेही काम रखडल्याचे ते म्हणाले.

2024 अखेर काम पूर्ण करणार
या मार्गाचे काम वेगाने करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार पर्यायी पंत्राटदार नेमण्यात आलेले आहेत. हे काम प्रगतिपथावर आहे. सर्व कामे डिसेंबर 2024 अखेर पूर्ण करणार असल्याचे मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले. टप्प्यांचा विचार करता बहुतांशी टप्प्यांचे काम 85 ते 90 टक्के झाले असल्याचेही ते म्हणाले.