मुंबई – गोवा महामार्गावर गणेशोत्सवात चाकरमान्यांचे कंबरडे मोडणार, खड्ड्यांमुळे रस्त्याची दैना

>>दुर्गेश आखाडे

देशातील सर्वाधिक काळ रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची यंदाच्या पावसाळ्यात अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळा ठरत आहे. या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. चिपळूणपासून लांज्यापर्यंत महामार्गाचे काम रखडले आहे.

गेली 15 वर्षं मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या अनेक तारखा जाहीर केल्या, मात्र गडकरी यांची ही भविष्यवाणी ठेकेदार कंपन्यानी पह्ल ठरवली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणमधील खेरशेतपर्यंत महामार्गाचे काम झाले आहे. पुढे आगवे, सावर्डे, वहाळ फाटा, कोंडमळा, कामथे आणि चिपळूण शहरात वाहनचालकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सावर्डे-वहाळ फाटा येथील पूलही खचलेला आहे. काही दिवसांपूर्वीच परशुराम घाटातील भराव वाहून गेला होता. आता परशुराम घाटात काम सुरू असले तरी कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उभे रहात आहे.

संगमेश्वर ते लांजा दरम्यानच्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील इतर भागातील कामे सुरू झाली तरी संगमेश्वर ते लांज्यापर्यंतच्या महामार्गाचे काम ठप्प होते. ठेकेदार कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे संगमेश्वरपासून रत्नागिरी आणि लांज्यापर्यंतचे काम रखडले होते. अखेर पहिल्या ठेकेदाराला नारळ देऊन दुसरा ठेकेदार नेमला. दुसऱ्या ठेकेदाराकडूनही कामात प्रगती होत नसल्याने आता तिसरा ठेकेदार नेमल्यानंतर काम सुरू झाले.

महामार्गावर हातखंबा ते पाली दरम्यान सध्याचा प्रवास म्हणजे अतिशय त्रासदायक आहे. या रस्त्याचे काम सुरू असल्याने मोठय़ा प्रमाणात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी डायव्हर्जन आहेत. त्यामुळे वाहन चालकाला कसरत करावी लागत आहे. लांजा बाजारपेठेतील रस्त्याचे काम रखडल्याने संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. लांजा, चिपळूणसह अनेक ठिकाणी उड्डाणपुलाची कामे रखडली आहेत.

मोठय़ा प्रमाणात खड्डे

मुंबई-गोवा महामार्गावर ज्या भागात सिमेंट काँक्रीटचा रस्ता झालेला नाही त्या भागातून जुन्या रस्त्यावरूनच वाहतूक सुरू आहे. या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्त्यात भलेमोठे खड्डे आणि त्यात डायव्हर्जन असल्याने वाहनचालकांची महामार्गावर ‘सर्कस’ सुरू असते.