घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं; मृतांचा आकडा 8 वर

सोमवारी वादळी वाऱ्यासह आलेल्या मान्सून पूर्व पावसाने मुंबईला अक्षरशः झोडपून काढले. सोमवारी दुपारच्या सुमाराला अचानक आकाशात दाटून आलं आणि धुळीचं वादळ सगळीकडे पसरलं. वादळी वाऱ्यासह तुफान पाऊसही मुंबईच्या अनेक भागात कोसळला. दरम्यान, या वाऱ्यामुळे मुंबईतील घाटकोपर येथील पेट्रोलपंपावरील होर्डिंग कोसळलं.

या होर्डिंगच्या खाली अनेक जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. या दुर्घटनेतील मृत्युचा आकडा 8 वर पोहोचला असून 66 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मदतकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.

सोमवारी दुपारी साडे चारच्या सुमाराला वादळी वाऱ्याने हे होर्डिंग कोसळलं. या होर्डिंगचा आकार सुमारे 70 मीटर इतका मोठा आहे. हे होर्डिंग रेल्वे पेट्रोलपंपावर कोसळलं. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला असून 66 जण जखमी झाले आहेत. त्याखेरीज 20 ते 30 जण अद्यापही होर्डिंगखाली अडकले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.