24 तासांत नागरिकांचे एक कोटी वाचवले, मुंबई सायबर पोलिसांची चांगली कामगिरी

प्रातिनिधिक फोटो

सायबर भामटे नवनवीन शक्कल लढवून नागरिकांची चुटकी सरशी ऑनलाइन फसवणूक करतात. गेल्या 24 तासांतदेखील लोकांना फसविण्यात त्यांना यश आले. पण वेळीच 1930 वर नागरिकांनी संपर्क साधल्याने मुंबईच्या सायबर पोलिसांनी झटपट कारवाई करत नागरिकांचे एक कोटी एक लाख 58 हजार 727 रुपये सायबर भामट्यांच्या खिश्यात जाण्यापासून रोखले.

गेल्या 24 तासांत सायबर भामट्यांनी नागरिकांना विविध फ्रॉडच्या माध्यमातून फसवले होते. त्यातही डिजिटल अॅरेस्ट फ्रॉडच्या माध्यमातून नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळण्यात आले होते. पण संबंधितांनी वेळीच 1930 वर संपर्क सांधून पोलिसांच्या नजरेस ही बाब आणून दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ पैसे वळते झाले अशा बॅकांना संपर्क साधून नागरिकांचे पैसे तत्काळ गोठवले.

जवळपास एक कोटी एक लाख 58 हजार रुपये जाण्यापासून पोलिसांनी रोखल्याने सायबर गुन्हेगारांना चांगलाच दणका बसला. नागरिकांनी वेळिच 1930 वर संपर्क साधून तक्रार दिल्याने इतकी रक्कम आम्हाला जाण्यापासून रोखता आली असे मुंबई सायबर पोलिसांनी सांगितले.