Baba Siddique Murder Case – हल्लेखोरांनी युट्यूबवर व्हिडीओ पाहून गोळी झाडण्याचा केला होता सराव! धक्कादायक माहिती समोर

अजित पवार गटाचे नेते व माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्याकांडाबाबत आता मुंबईच्या गुन्हे शाखेने मोठी माहिती दिली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येचा पूर्ण कट 3 महिन्यांपूर्वी पुण्यामध्ये रचला गेला. बाबा सिद्धिकी यांना मार्गातून हटविण्यासाठी आरोपींनी अनेकदा विना हत्यार घराची रेकीही केली. हत्येत सामील असलेले दोन शूटर्स गुरमैल सिंह आणि धर्मराज कश्यप यांनी गोळी चालविण्याचा सराव युट्यूबवर व्हिडीओ पाहून केल्याची धक्कादायक माहिती मुंबई गुन्हे शाखेने दिली आहे.

12 ऑक्टोबरच्या रात्री साधारण नऊच्या सुमारास अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्धीकी यांची मुंबई येथील वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळी ते मुलगा जीशान यांच्या कार्यालयातून बाहेर पडत होते. शूटर्संनी त्यांच्यावर 6 राऊंड फायरिंग केली. त्यात तीन गोळ्या पोटात आणि छातीला लागल्या. त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, काही वेळातच त्यांचा मृत्यू झाला.

बाबा सिद्धिकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई टोळीने स्वीकारली आहे. जो कोणी सलमान खान आणि दाऊदच्या टोळीला मदत करेल, त्यांनी सांभाळून राहा, असा इशारा बिष्णोई टोळीने ट्विट करून दिला आहे. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत गुरमैल सिंह, धर्मराज कश्यप, प्रवीण लोणकर आणि हरीश कुमार निषाद या चार आरोपींना पकडले आहे. या प्रकरणात 3 आरोपी अद्यापही फरार आहेत. तर मुंबई गुन्हे शाखेने घटनेच्या वेळी अनेक प्रत्यक्षदर्शीही होते. त्या 15हून अधिक जणांचा जबाब नोंदवला आहे.