>>मंगेश वरवडेकर
एक काळ असा होता की हिंदुस्थानी संघात पाच-पाच “कर” आडनावाचे मुंबईकर असायचे. हळूहळू ते “कर’ नाहीसे होऊ लागले. परिणामता: गेल्या दशकभरात हिंदुस्थानी संघातील मुंबईचा दबदबा कमी होत गेला होता, पण पुन्हा एकदा राष्ट्रीय संघातील मुंबईचे वर्चस्व वाढू लागलेय. उद्यापासून राजकोट येथे सुरु होणार्या तिसर्या कसोटीसाठी ‘रणजी क्रिकेटचा बादशाह’ सरफराज खानच्या पदार्पणाची दाट शक्यता आहे. तो संघात खेळला तर मुंबईचा ७६ वा रणजीपटू कसोटीपटूची कॅप परिधान करेल.
हिंदुस्थानी क्रिकेटवर नेहमीच मुंबईचे वर्चस्व राहिले आहे. दोन दशकांपूर्वी हिंदुस्थानचा निम्मा संघ मुंबईचाच असायचा, पण महेंद्रसिंग धोनीच्या उदयानंतर हिंदुस्थानातील छोट्याछोट्या शहरांमधूनही क्रिकेटपटू घडू लागले. त्यामुळे आपोआप मुंबईचे प्रतिनिधित्व कमी झाले. आजवर गेल्या ८० वर्षांच्या कसोटी इतिहासात ३१० खेळाडूंनी कसोटीपटू होण्याचा मान मिळविला आहे. त्यापैकी ७६ कसोटीपटू हे मुंबईकर होते. म्हणजेच आजवर हिंदुस्थानी संघात कसोटी पदार्पण करणार्या खेळाडूंमध्ये २५ टक्के मुंबईकर होते. १९४३-४४ साली मुंबईसाठी खेळलेले अन्वर हुसैन देश फाळणीनंतर पाकिस्तानकडून खेळले होते. हा अपवाद वगळता मुंबईचे रणजीपटू हिंदुस्थानी संघासाठीच खेळले आहे. आता मुंबईकर कसोटीपटूच्या यादीत सरफराजचेही नाव लवकरच जोडले जाणार, यात आता तीळमात्र शंका उरलेली नाही. जर विशाखापट्टणम कसोटीत सरफराजला पदार्पणाची संधी लाभली असती तर रोहित, श्रेयस आणि यशस्वीसह सरफराज चौथा मुंबईकर खेळला असता. तब्बल दोन दशकानंतर मुंबईचे चार खेळाडू कसोटी संघात दिसले असते. पण रजत पाटीदारला संधी पदार्पणाची संधी लाभली आणि मुंबईची ती संधी थोडक्यात हुकली.
गेल्या अडीच दशकांत केवळ दहा मुंबईकर कसोटीपटू
मुंबईचे राष्ट्रीय क्रिकेटमध्ये वर्चस्व अबाधित आहे. मात्र २००० सालानंतर मुंबईचे वर्चस्व आपोआप कमी होत गेले. गेल्या वर्षभरातच श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैसवाल या मुंबईकरांनी कसोटी पदार्पण केले असले तरी गेल्या २३ वर्षात समीर दिघे, साईराज बहुतुले, मुनाफ पटेल, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकुर या ७ खेळाडूंनाच कसोटी पदार्पण करता आले आहे. मात्र २००० सालाच्या आधी मुंबईकर रणजीपटू मोठ्या संख्येने कसोटी खेळत होते.
हिंदुस्थानी संघात अमराठी मुंबईकर
सध्या हिंदुस्थानी संघात खेळत असलेल्या मुंबईकर खेळाडूंमध्ये अधिक खेळाडू हे अमराठी आहेत. आता हिंदुस्थानी संघात शार्दुल ठाकुरचा अपवाद वगळता एकही मराठी खेळाडू उरलेला नाही. अजिंक्य रहाणे गेल्याच वर्षी संघाबाहेर फेकला गेला आहे. मात्र रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैसवाल, शिवम दुबे हे मुंबईकर मुंबईचे हिंदुस्थानी क्रिकेटमधील वर्चस्व दाखताना अफलातून खेळ करत आहेत. मुंबई रणजी संघाची कामगिरी पाहाता अनेक मुंबईचे खेळाडू हिंदुस्थानी संघाच्या वाटेवर आहेत.
१९७१ च्या दिल्ली कसोटीत सहा मुंबईकर
१९७१-७२च्या मोसमात इंग्लंडविरुद्धच्या दिल्ली कसोटीत हिंदुस्थानी संघात चक्क सुनील गावसकर, अजित वाडेकर, रामनाथ पारकर, एकनाथ सोलकर, फारुख इंजीनियर आणि दिलीप सरदेसाई हे सहा मुंबईकर एकत्र खेळले होते. असेच सहा मुंबईकर १९७४ च्या बर्मिंगहॅम कसोटीतही खेळले होते. हिंदुस्थानी कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कर्नाटकचेही सहा खेळाडू १९९९ च्या मोहाली कसोटीत संघातून उतरले होते. हे तीन अपवाद वगळता पाच मुंबईकर असंख्य कसोटीत एकत्रित खेळले आहेत