काल पहिल्या दिवशी आघाडीवीरांना निराशा केली असली तरी त्रिपुराविरुद्धच्या रणजी सामन्यात तळंदाजांनी (तळाच्या फलंदाजांनी) मुंबईची शान वाढवणारी आणि राखणारी पुन्हा एकदा फलंदाजी करत संघाला 450 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. त्यानंतर त्रिपुराने सावध सुरुवात करत दिवसअखेर 1 बाद 60 अशी मजल मारली. खेळ थांबला तेव्हा जीवनजोत सिंह (39) आणि परवेझ सुल्तान (1) खेळत होते.
रणजी विजेत्या मुंबईला सलामीच्याच सामन्यात बडोद्याकडून धक्का बसला होता. मात्र दुसऱया सामन्यात त्यांनी महाराष्ट्राचा पराभव करत आपल्या गुणांचे खाते उघडले होते. आता तिसऱया सामन्यात मुंबईची आघाडीची फळी पुन्हा कोलमडली. काल अंगरिक्ष रघुवंशी (28), आयुष म्हात्रे (4), सिद्धांत अधटराव (5), अजिंक्य रहाणे (35) आणि सिद्धेश लाड (29) यांनी निराशा केली होती. मात्र नवोदित सुयांश शेडगेने 99 धावांच्या तडाखेबंद खेळी करत मुंबईला दिवसअखेर 6 बाद 248 अशा स्थितीत नेले.
मुंबईची पुन्हा जोरदार तळंदाजी
गेल्या मोसमातही मुंबईच्या तळंदाजांनीच धावांचा पाऊस पाडला होता आणि या मोसमातही तळंदाज पुन्हा फॉर्मात आले आहेत. मुंबईने कालच आपले 6 फलंदाज गमावले होते. कालच्या 6 बाद 248 धावांवरून डाव सुरू करणाऱया मुंबईसाठी आज शम्स मुलानी (71) आणि हिमांशू सिंग (59) यांनी सातव्या विकेटसाठी 61 धावांची भागी करत संघाला तीनशेपार नेले. त्यानंतर हिमांशूने शार्दुल ठाकूरच्या मदतीने 400च्या समीप नेले. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 85 धावांची भर घातली. शार्दुलने 53 चेंडूंत तडाखेबंद 62 धावा टोलवताना 3 षटकार आणि 4 चौकार लगावले. मग मोहित अवस्थी (25) आणि रॉयस्टन डायस (19) यांनीही सुरेख खेळ करत मुंबईला 450 धावांचा टप्पा गाठून दिला. पहिल्या डावात आघाडी मिळवण्यासाठी मुंबईला ही धावसंख्या पुरेशी ठरणार हे निश्चित. त्रिपुराने आपल्या डावाची सुरुवात सावध केली असली तरी उद्या मुंबईचे गोलंदाज त्रिपुराचा डाव लवकर गुंडाळून सामन्यावर आपली पकड घट्ट करण्याचा प्रयत्न करणार, याचे संकेत दुसऱया दिवसअखेर मिळाले आहे.
काटेचे नाबाद शतक; महाराष्ट्र 276
संभाजीनगर ः यजमान महाराष्ट्राने पहिल्या डावात 80 षटकांत 5 बाद 263 धावसंख्येपर्यंत मजल मारत मेघालयाला चोख प्रत्युत्तर दिले. मेघालयाने पहिल्या डावात 88.3 षटकांत 276 धावसंख्या उभारली. महाराष्ट्राकडून हर्षल काटेची नाबाद शतकी खेळी आणि अझीम काझीचे अर्धशतक ही महाराष्ट्राच्या डावाची वैशिष्टय़े ठरली.
मेघालयाने कालच्या 8 बाद 274 धावसंख्येवरून खेळ सुरू केल्यानंतर त्यांचे उर्वरित दोन फलंदाज दोन धावांची भर घालून बाद झाले. त्यामुळे मेघालय पहिल्या डावात 276 धावसंख्यापर्यंत पोचली. प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्राची निराशाजनक सुरुवात झाली. मुर्तझा ट्रंकवाला (7), सिद्धेश वीर (26), सचिन धस (6) व कर्णधार अंकित बावणे (9) या आघाडीच्या फळीने निराशा केल्याने महाराष्ट्राची एक वेळ 4 बाद 51 अशी दुर्दशा झाली होती. मात्र, त्यानंतर हर्षल काटे (खेळत आहे 117) व अझीम काझी (66) यांनी पाचव्या विकेटसाठी 142 धावांची भागीदारी करीत महाराष्ट्राचा डाव सावरला. 114 चेंडूंत 7 चौकार ठोकून काझी बाद झाला. दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा मंदार भंडारी 31 धावांवर हर्षल काटेला साथ देत होता. महाराष्ट्राचा संघ पहिल्या डावात अजून 13 धावांनी पिछाडीवर आहे. मेघालयाकडून आकाश चौधरीने 3, तर आर्यन बोराने एक बळी टिपला.