भाजप उमेदवार आमदार तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावलं, प्रचार सभाही उधळली

नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील मांजरी गावाचा विकास केला नाही, ना रस्ता ना पाणी, अशी अवस्था असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी भाजपचे आमदार डॉ. तुषार राठोड यांना गावातून पिटाळून लावले. यावेळी शेकडो नागरीकांनी आमदारास गराडा घालत जाबही विचारला. तुषार राठोड यांना गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला.

मागील पाच वर्षांत काय विकास कामे केली? गावात कुठलाच विकास केला नाही. मागील पाच वर्षांत गावात कधी आले नाही, असे म्हणत राठोड यांच्या प्रचार सभेत गावकऱ्यांनी गोंधळ घालत सभा उधळून लावली. मुखेड तालुक्यातील मांजरी गावात काल रात्री हा प्रकार घडला. भाजपने तुषार राठोड यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. मुखेड मतदारसंघात राठोड हे गावभेटी आणि प्रचार सभा घेत आहेत. याच प्रचार सभेदरम्यान मांजरी गावात गावकऱ्यांनी राठोड यांना मागील पाच वर्षांत काय विकास कामे केली? असा सवाल करत त्यांची प्रचार सभा उधळून लावली.

मुखेड तालुक्यातील मांजरी येथे शुक्रवारी रात्री भाजप आमदार तुषार राठोड यांची गावभेट होती. यावेळी एका शेतकऱ्याने माझ्या घराकडे पाणीपुरवठा होत नसल्याचे सांगत पाच वर्षांत काय विकास केला? असा प्रश्न विचारला. त्यावेळी गावातील इतर ग्रामस्थांनीही प्रश्नांचा भडीमार करताच तुषार राठोड यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला. मांजरी येथील मोकळ्या जागेवर तुषार राठोड यांची काल रात्री सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत हा सर्व प्रकार घडला.