Movie Review – पटकथेत फसलेला प्रयोग – पंचक

>> रश्मी पाटकर 

माणूस या जगात सगळ्यात जास्त घाबरतो तो मृत्युला. त्यामुळे भविष्यवेध घेताना जसा प्रगतीच्या संधी तो उघडपणे शोधतो तसाच मनाच्या तळाशी अतिशय सूक्ष्मपणे मृत्युचा वेधही घेत असतो. फक्त ती कल्पना त्याला नकोशी असते. त्यात जर त्याला आपल्या आप्तेष्टाच्या मृत्युनंतर आपला मृत्यू संभवेल असं भाकित ऐकायला मिळालं, तर त्याची आणखी भंबेरी उडू शकते. त्याचंच चित्रण पंचक हा चित्रपट करतो. पंचक हे मृत्युनंतर लागणाऱ्या अनिष्ट नक्षत्रांपैकी एक आहे, एखाद्याच्या मृत्युवेळी ते नक्षत्र लागलं तर त्याच्या घरात किंवा आप्तेष्टांमध्ये पाच मृत्यू संभवतात, असं मानलं जातं. या नक्षत्राच्या भाकिताभोवती या चित्रपटाची कथा फिरते.

कोकणातल्या निसर्गरम्य गावात राहणाऱ्या खोत नावाच्या गृहस्थांचा मृत्यू होतो. आयुष्यभर विज्ञानवादावर जगलेले खोत आपला मुलगा माधव यालाही तो वारसा देऊन जातात. पण, त्यांचे कुटुंबीय मात्र धार्मिक विचारांचे असतात. खोतांच्या मृत्युनंतर त्यांना पंचक लागल्याचं गुरुजी सांगतात आणि घरात एकच गहजब उडतो. पण, विज्ञानवादी खोतांनी आपला देह मेडिकल कॉलेजच्या मुलांसाठी दान केलेला असल्याने त्यांची पंचाईत होते. अखेर, त्यांच्या शेवटच्या इच्छेनुसार देहदान केलं जातं आणि इथे घरात घाबरगुंडी उडते. कारण, पंचक लागल्यानंतरचे विधी न झाल्याने आता घरात पाच मृत्यू होणार या भाकिताला खरं मानून घरचे सगळे दहशतीत जगायला लागतात. त्यात त्यांच्यासोबत विचित्र घटना घडायला सुरुवात होते आणि घरात अजून एक मृत्यू होतो. पंचक नेमकं काय असतं, त्याचं भाकित खरं होतं का याचा शोध या चित्रपटात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाची संहिता चांगली असली तरी पटकथेत चित्रपट पार गंडला आहे. त्याला संवादांनीही पुरेशी साथ दिलेली नाही. त्यामुळे ही कथा, पंचकाचं भय, सोबत घडणाऱ्या घटना यांच्याशी प्रेक्षक जुळवून घेऊ शकत नाही. विशेषतः मध्यंतरानंतर चित्रपटाची पटकथा भरकटत जाते. याचं मुख्य कारण चित्रपटाचा बाज हा आहे. चित्रपटाचा बाज विनोदी, कौटुंबिक, विज्ञानवादी की सामाजिक ठेवायचा, यात दिग्दर्शक प्रचंड गडबडले आहेत आणि तिथेच चित्रपट फसला आहे. एका लयीत चाललेल्या कथेला अगम्य प्रसंगांची जोड दिल्याने यात भर पडते. संवादही म्हणावे तसे ठसठशीत नाहीत. मालवणी भाषिक प्रेक्षक यातील भाषेवर नाराज होतील अशी दाट शक्यता आहे.

तीच बाब अभिनयाची. या चित्रपटात अनेक कसलेले कलाकार आहेत. मात्र, त्यांचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यात आलेला नाही. दिलीप प्रभावळकर हे किती प्रतिभावान कलाकार आहेत याची झलक त्यांच्यावर चित्रीत झालेल्या प्रसंगांतून येते. त्यांचा संपूर्ण वावर हा अतिशय लोभस आहे, मात्र त्यांना या चित्रपटात म्हणावं तसं कामच नाही. सतीश आळेकर, भारती आचरेकर, आनंद इंगळे, नंदिता पाटकर, सागर तळाशिकर, संपदा जोगळेकर, आशीष कुलकर्णी, दिप्ती देवी, आदिनाथ कोठारे, तेजश्री प्रधान असे कलाकार असूनही त्यातील एकाच्याही व्यक्तिरेखेला न्याय मिळालेला नाही. गाणीही ठिकठाक आहेत. या चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे नेपथ्य आणि सिनेमॅटोग्राफी. तळकोकणातले शेतीचे पट्टे, टुमदार कौलारू घर, सारवलेलं अंगण, निमुळते रस्ते यांचं सुंदर चित्रण चित्रपटात आलं आहे. त्यासाठी पैकीच्या पैकी मार्क द्यावे लागतील.

थोडक्यात, कोणत्याही रुपाने येणारा मृत्यू हा माणसासाठी भयंकरच असतो. मृत्यू इतकीच त्याची भीती हाही माणसाच्या आयुष्याचा एक शाश्वत भाग आहे. पण, ती भीती दाखवण्यात पंचक अयशस्वी ठरला आहे.