केरळ पाठोपाठ मणिपूरमध्ये पावसाचा कहर, दरड कोसळून माय-लेकाचा मृत्यू

केरळ पाठोपाठ मणिपूरमध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. मुसळधार पावसामुळे मणिपूरच्या तामेंगलाँग जिल्ह्यातील एका गावात सोमवारी मध्यरात्री भूस्खलनाची घटना घडली आहे. या दुर्घटनेत मणिपूर पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याच्या पत्नी आणि मुलाचा ढिगाऱ्याखाली दबल्याने मृत्यू झाला आहे. तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मणिपूरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. राज्यातील तामेंगलाँग जिल्हा हा डोंगराळ भागात असल्याने तेथे नैसर्गिक आपत्तीचा धोका अधिक असतो. तामेंगलाँग जिल्ह्यातील दिमथनलाँग गावात मणिपूर पोलीस दलातील हवालदार रिंगसिनलुंग काहमेई आपल्या कुटुंबासह राहत होते. सोमवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे काहमेई यांच्या घराच्या मागे असलेल्या डोंगराचा काही भाग घरावर कोसळला.

यावेळी गाढ झोपेत असलेल्या रिंगसिनलुंग काहमेई यांच्या पत्नी आणि मुलाचा ढिगाऱ्याखाली दबून जागीच मृत्यू झाला तर काहमेई गंभीर जखमी झाले. काहमेई यांना पुढील उपचारांसाठी मंगळवारी विमानाने इम्फाळला नेण्यात आले आहे.

मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांनी ट्विट करुन या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. “तामेंगलाँग वॉर्ड क्रमांक 3, दिमथनलाँग गावात काल रात्री झालेल्या भूस्खलनामुळे आई आणि तिच्या मुलाचे दुःखद निधन झाल्याबद्दल खूप दुःख झाले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या रिंगसिनलुंग काहमेई यांना आवश्यक वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आम्ही त्वरित पावले उचलत आहोत”, असे मुख्यमंत्री सिंग यांनी म्हटले आहे.